
आज रविवारी रात्री ८ वाजता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा दोन तासाचा विशेष भाग रंगणार आहे. यश आणि नेहाचे लग्न कधी होणार याची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते. त्यामुळे हा रंगतदार सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर झालेले पाहायला मिळत आहेत. मालिकेत आजच्या विशेष भागात संगीत सोहळा पाहायला मिळणार आहे. बंडू काका आणि काकूंचा एक खास डान्स त्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर समीर आणि शेफाली देखील पांडू चित्रपटातील गाण्यावर नृत्य सादर करणार आहेत. परी देखील आपल्या आईच्या लग्नात एक खास गाणं म्हणणार आहे. ‘आईचं लग्न’…या गाण्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे.

बालगायिका पलाक्षी दीक्षित हिने हे गाणं परिसाठी गायलं आहे. त्यामुळे नेहा आणि यशचे लग्न आता मालिकेतून पाहायला मिळणार आहे. आपलं घर सोडून जाताना नेहा खूपच भावुक झाली होती. या घरातल्या आठवणींना ती उजाळा देत असतानाच काकू तिच्याकडे येतात आणि या घराला आनंदात निरोप दे असे तिला सांगतात. इतकी वर्षे आपण या घरात राहिलो या घराने आपल्याला कधीच काही कमी पडू दिले नाही असे भावनिक होऊन नेहा घराचा निरोप घेते. आणि लग्नाच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रवाना होते. आता नेहा आणि यशचे लग्न सुरळीत पार पडणार अशी प्रेक्षकांना खात्री वाटत असतानाच मालिकेत एक धक्कादायक वळण आलेले पाहायला मिळणार आहे. या धक्कादायक वळणामुळे त्यांच्या लग्नात मोठे विघ्न आलेले पाहायला मिळणार आहे. कालच्या भागात नेहा आणि यशच्या लग्नाची बातमी पेपरमध्ये छापून आलेली पाहायला मिळाली होती. नेमकी हीच बातमी एक व्यक्ती वाचताना दाखवली. ही बातमी वाचून हा व्यक्ती नेहाच्या चाळीत दाखल होतो. मात्र नेहा आणि चाळीतले सगळे लोक लग्नाला जायला तिथून निघालेली असतात. गुड्डी देखील आपली बॅग घेऊन गाडीत बसायला जात असते तिथेच हा व्यक्ती येऊन ‘सगळे गेले का?’ असा प्रश्न तिला विचारतो.

तेव्हा ‘मी खूप घाईत आहे तुम्हाला काय विचारायचं असेल ते गाडीत जाऊन विचारा’ असे गुड्डी म्हणते. नेहाची चौकशी करणारी ही व्यक्ती नेमकी कोण? असा मोठा प्रश्न मालिकेच्या या ट्विस्टमधून प्रेक्षकांना पडला आहे. अर्थात हा नेहाचा पहिला नवरा तर नाही ना? अशी पुसटशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. चाळीत आलेली ही व्यक्ती आता नेहा आणि यशच्या लग्नसोहळ्याच्या ठिकाणाचा पत्ता शोधत तिथे पोहोचणार आहे. त्यामुळे या दोघांच्या लग्नात मोठे विघ्न आलेले पाहायला मिळणार आहे. ही व्यक्ती नेहाचा नवरा असावा असा अंदाज बांधला जात आहे. मात्र त्याच्या येण्याने नेहा आणि यशचे लग्न थांबणार की आणखी काही वेगळे घडणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या भागाची आतुरता तमाम प्रेक्षकांना लागून राहिली आहे.