
झी मराठी वाहिनीवर “माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका नुकतीच प्रसारित झाली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे या तगड्या कलाकारांमुळे ही मालिका अधिकच खुलून आलेली पाहायला मिळत आहे. शीतल क्षीरसागर, संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी या जाणत्या कलाकारांचीही साथ या मालिकेला मिळाली आहे. या मालिकेत परी हे पात्र देखील विशेष भाव खाऊन जाताना दिसत आहे. परीची भूमिका बालकलाकार ‘मायरा वायकुळ’ हिने साकारली आहे तर आणखी एक बालकलाकार या मालिकेतून पाहायला मिळतो आहे.

‘पिचकू’ नावाचे हे कॅरेक्टर थोडेसे अल्लड दाखवले आहे. यशच्या (श्रेयस तळपदे) मोठ्या काकूचा मुलगा ‘पिचकू’ ही भूमिका बालकलाकार ” वेद आंब्रे” याने साकारली आहे. वेद खूप आधीपासूनच वेगवेगळ्या टीव्ही मालिकांमधून काम करतो आहे बहुतेकांनी या चिमुरड्याला ओळखलेही असावे. नुकताच तो आई कुठे काय करते या मालिकेत ज्युनिअर यशच्या भूमिकेत दिसला होता. या मालिकेखेरीज गाथा नवनाथांची, स्वराज्यजननी जिजामाता, सिंधू, डॉ बाबासाहेब आंबेडकर, विठू माऊली, तू माझा सांगाती, लक्ष्मी सदैव मंगलम, ग्रहण,खुलता कळी खुलेना, लक्ष्य, सावधान इंडिया, अस्मिता, स्पेशल ५, आपला माणूस अशा अनेक गाजलेल्या मालिकेतून तो नेहमीच प्रेक्षकांसमोर आला आहे. एवढ्या कमी वयात ढीगभर मालिका साकारणारा वेद हा बहुतेक एकमेव बालकलाकार असावा ज्याने आजवर मराठी सृष्टीतील बऱ्याचशा कलाकारांबरोबर काम केले आहे. या यशामागे निश्चितच त्याची मेहनत कामी आली असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या सर्व मालिकांमधून वेद आंब्रे हे नाव आज प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले असेलच.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत तो पिचकूच्या भूमिकेत दिसत आहे. सध्या त्याच्या अभिनयाला पुरेसा वाव नसला तरी पुढे जाऊन हे पात्र काय धमाल उडवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण यशच्या काकू आपल्याच मुलाला प्रॉपर्टी मिळवून देण्यासाठी खेळी खेळताना दिसणार आहेत. पिचकू हे पात्र देखील त्याच धाटणीचे असेल किंवा तो यशची बाजू घेण्याचा प्रयत्न करेल हे येत्या काही भागात स्पष्ट होईल. लहानग्या मायरा वायकुळ हिच्यामुळे मालिका पाहायला खूपच मजा येते असं अनेकांचं मत आहे. मालिका २३ ऑगस्ट रोजी प्रसारित झाली मालिकेचे फक्त ५ च भाग प्रकाशित झालेत पण मालिकेला चांगलीच प्रसिद्धी मिळालेली पाहायला मिळतेय. मालिकेतील या आणखी एका दमदार मालिकेनिमित्त वेद आंब्रे या बालकलाकाराला खूप खूप शुभेच्छा…