सध्या मालिकांमध्ये काम करत असलेले कलाकार त्यांच्या व्यक्तीगत कारणांसाठी ब्रेक घेताना दिसत आहे. कुणी त्यांच्या नाटकांच्या दौऱ्यांमुळे ऑफ कॅमेरा जातात तर काही कलाकार त्यांच्या छंद आणि आवडीनिवडी जपण्यासाठी मालिकेच्या सेटवरून सु्ट्टी घेतात. शिवाय मालिकेतून ब्रेक घेत असल्याचं खरं कारणही हे कलाकार त्यांच्या सोशलमीडियावर पेजवर जाहीर करत चाहत्यांशी संवाद साधत असतात. जर मुख्य कलाकार असतील आणि त्यांना ब्रेक हवा असेल तेव्हा मालिकेच्या कथानकात काही बदल केले जातात, तर काही वेळा कलाकार मालिकेच्या कथानकातही त्याच गावाला गेला असे दाखवण्यात येते जेथे तो प्रत्यक्षात गेलेला असेल. थोडक्यात काय तर कलाकारांनी त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी ब्रेक घेण्याची प्रेक्षकांनाही सवय झाली आहे.

सध्या लोकप्रिय मालिकांच्या यादीत असलेल्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील विश्वजित चौधरी ही भूमिका करणारे अभिनेते आनंद काळे हे देखील पुढच्या काही भागात या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाहीत. मालिकेतून ते ब्रेक घेणार असल्याची माहिती आता या मालिकेच्या आणि विश्वजित काकांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचली आहे. चलो लेह लडाख असं म्हणत आनंद काळे यांनी त्यांच्या इन्स्टापेजवर ही माहिती शेअर केली आहे. कोल्हापूरचे असलेले आनंद काळे हे कोल्हापूर ते काश्मीर, लेह लडाख अशी बाइक सफर करण्यासाठी रवाना होणार आहेत. त्यासाठी आनंद यांनी २१ दिवसांची सुट्टी घेतली आहे. लाडक्या विश्वजित काकांच्या या स्पेशल ट्रीपला मालिकेच्या टीमने आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद काळे हे गेल्या ३० वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. नाटक व मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत आनंद काळे यांनी साकारलेली कोंडाजीबाबा फर्जंद ही भूमिका खूप गाजली. सौदामिनी ताराराणी मालिकेतील हंबीरराव मोहिते यांच्या रूपातही आनंद यांनी पसंती मिळवली आहे. लेक माझी दुर्गा मालिकेतील त्यांच्या भूमिकेचंही कौतुक होत आहे.

कोल्हापुरात त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे. तसेच चित्रीकरणासाठी लागणारी सेवाही ते पुरवतात. विविध प्रकारच्या कलात्मक मूर्ती बनवण्याचाही त्यांचा व्यवसाय आहे. या व्यतिरिक्त आनंद यांना स्पोर्टस बाइकची आवड असून कोल्हापुरात कॉलेजमध्ये असतानाही आनंद हे बाइक रायडर म्ह्णून ओळखले जायचे. रेसिंगमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे. काही वर्षापूर्वी त्यांनी बाइक खरेदी केली आहे. स्पोर्टस बाइकवरून काश्मीर, लेड लडाख ट्रीप करण्याची त्यांची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ते आता बाइकला किक मारणार आहेत. काही दिवसांपूर्वी संगीतकार अजय गोगावले यांनी स्पोर्टस बाइक खरेदी केली तेव्हा त्यांना शुभेच्छा देताना आनंद काळे यांनी बाइक राइड करत लेहलडाखला जाऊया असं म्हटलं होतं. तेव्हा अजय आणि आनंद यांनी जुलैमध्ये हा प्लॅन बनवला होता. त्या प्लॅननुसार आता आनंद काळे २१ दिवस ७००० किलोमीटरचा प्रवास करून लेह लडाखची बाइक राइड करणार आहेत. हा सगळं प्रवास करून ते पुन्हा मालिकेत काम करणार आहेत. त्यांना मालिकेसाठी आणि ह्या २१ दिवसाच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा…