झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळचं अभिनित केलेलं आई हे नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आई विना मला करमत नाही या गाण्याला अल्पावधीतच प्रेक्षकांनी देखील पसंती दर्शवलेली पाहायला मिळत आहे. कोलीवूड प्रस्तुत आई या गाण्याचे दिग्दर्शन तसेच संगीत दिग्दर्शन प्रवीण कोळी यांनी केलं आहे. तर दिया वाडकर आणि स्नेहा महाडिक यांनी हे गाणं गायलं आहे. मायरासोबत अभिनेत्री अंकिता राऊत माय लेकीच्या मुख्य भूमिकेत झळकताना दिसत आहेत. हे गाणं चित्रीत करण्यात आलं त्यावेळी सेटवर मायराने भरपूर मजामस्ती केलेली पाहायला मिळाली.

गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले त्यावेळी मायराला तिचे सर्व सिन कसे करायचे हे तिला दाखवले जात होते. एका सीनमध्ये मायराला पाण्यात जाऊन शूट करायला सांगितले त्यावेळी मायरा खूपच घाबरली होती. मी पाण्यात पडेल की काय अशी भीती तिला वाटत होती. त्यामुळे मी पायात चप्पल घालूनच पाण्यात उतरले असे ती म्हणते. गाण्याचे चित्रीकरण होत होते त्यावेळी मायराचे बाबा तिच्यासोबतच दिसले त्यामुळे सिन अधिक सोपा होण्यास तिला त्यांची मदत मिळाली होती. ह्या गाण्यात गावरान बाज असल्याने मायराला साजेसा मेकअप करण्यात आला होता. मात्र मला मेकअप दादानी काळं केलं आता मी त्यांना काळं करणार अशी मिश्किल तक्रार मायराने बोलून दाखवली. मी आता काळी दिसतीये माझ्या अंगावरचा हा रंगच जात नाहीये पुढच्या वेळी मला गोरं दाखवायचं असे देखील ती म्हणताना दिसली. अर्थात तिच्या ह्या तक्रारीवर मायरासह अनेकांना आपलं हसू आवरलं नाही.

मायराचे डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करताना दिसते. नुकतेच माझी तुझी रेशिमगाठ या मालिकेच्या सेटवर होळी साजरी करण्यात आली त्यावेळी एका व्हिडिओत तिचा निरागसपणा प्रेक्षकांना खूपच भावलेला पाहायला मिळाला. सेटवर हलकं फुलकं वातावरण असेल तर कलाकाराला देखील तो सिन करण्यास तितकीच मोकळीक मिळत असते. मायराच्या बाबतीत देखील असेच घडलेले पाहायला मिळते त्यामुळे मायराचे सीन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेले पाहायला मिळतात. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे या कलाकारांसोबत मायराची चांगली गट्टी जमली आहे त्यामुळे मायरा सेटवर अगदी बिनधास्तपणे वावरताना दिसते.