
गेल्या काही दिवसांपासून माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा आणि यशच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. साखरपुडा, मेहेंदी, हळद अशी रीतसर लग्नाची लगबग या मालिकेत पाहायला मिळाली आता नेहा आणि यशच्या संगीत सोहळ्यात बंडू काका काकू, विश्वजित ,मिथिला , परी, समीर शेफाली, सिम्मी काकू, आजोबा हे सर्वच जण गाण्यावर ठेका धरताना दिसणार आहेत. तर उद्या रविवारी म्हणजेच १२ जून रोजी दोन तासांच्या विशेष भागात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या दोन तासांच्या भागामध्ये परी आपल्या आईसाठी एक खास गाणं गाणार आहे. माझ्या आईच्या लग्नाला यायचं हं असे म्हणत या परीने मालिकेच्या प्रेक्षकांना आमंत्रण दिले आहे.

आपल्या आईच्या आणि फ्रेंडच्या लग्नात परी समजूतदारपणा दाखवत तितकीच मजा मस्ती करताना दिसत आहे. थाटामाटात होणार आईचं लग्न…हे परीवर चित्रित झालेलं गाणं नुकतंच रेकॉर्ड करण्यात आलं आहे. हे गाणं गायलं आहे पलाक्षी दीक्षित या बाल गायिकेनं. काही महिन्यांपूर्वीच झी मराठी वाहिनीवर सारेगमप लिटिल चॅम्पस हा रिऍलिटी शो होऊन गेला. या शोमध्ये पलाक्षी दिक्षितने सहभाग दर्शवला होता. या शोमध्ये तीने फायनलिस्ट होण्याचा मान पटकावला होता. पलाक्षीने आपल्या सुंदर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. आता तीला झी मराठी वाहिनीने मालिकेसाठी एक गाणं गाण्याची संधी मिळवून दिली आहे. प्रसिद्ध संगीतकार कुणाल करण यांच्या एलिक्सर स्टुडिओमध्ये आईचं लग्न हे गाणं नुकतंच रेकॉर्ड करण्यात आलं आहे. पलाक्षिने परीसाठी हे खास गाणं गायलं आहे. त्यामुळे हे पहिलं वहिलं गाणं रेकॉर्ड होत असताना पलाक्षी खूपच आनंदात दिसत आहे. उद्याच्या भागात परीच हे खास गाणं प्रेक्षकांना मालिकेतून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या गाण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.

मालिकेसाठी गाणं रेकॉर्ड करणं ह्या गोष्टी आता सर्रास पाहण्यात येतात. हा ट्रेंड मालिका सृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. अगदी होणार सून मी ह्या घरची मालिकेतही हा ट्रेंड पाहायला मिळाला. आई कुठे काय करते, तुझेच मी गीत गात आहे या मालिका गाण्यावर आधारित आहेत त्यामुळे या मालिकांसाठी नेहमीच वेगवेगळी गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. तुझेच मी गीत गात आहे ही मालिका गाण्यावरच आधारित आहे त्यामुळे आजवरच्या मालिकेच्या इतिहासात सर्वाधिक गाणी या मालिकेसाठीच रेकॉर्ड करण्यात आली आहेत. नेहा आणि यशचे लग्न झी मराठी वाहिनीसाठी टीआरपी वाढवणारे ठरणार आहे. त्यामुळे हा सोहळा अधिक रंगतदार कसा होईल याकडे लक्ष देण्यात आले आहे. आणि म्हणूनच या मालिकेने परिसाठी एक खास गाणं तयार केलं आहे. या गाण्यात परीची धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याने उद्याच्या भागाची आतुरता अधिक आहे.