
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील यशचे लाडके विश्वजित काका आणि परीचे मोठे बाबा साकारले आहेत अभिनेते आनंद काळे यांनी. आनंद काळे हे गेल्या दोन दशकाहून अधिक काळापासून मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका सृष्टीत कार्यरत आहेत. मालिकेत विश्वजित काका जेवढे लविश लाईफस्टाईल जगताना दिसतात तसेच ते खऱ्या आयुष्यात देखील भव्य जीवनशैली जगताना दिसतात. आज त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. आनंद काळे हे मूळचे कोल्हापूरचे. कोल्हापूर येथेच त्यांचे संपूर्ण शिक्षण झाले. माईसाहेब बावडेकर स्कुल मधून प्राथमिक शिक्षण तसेच डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्स मधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कोल्हापूर येथेच हौशी रंगभूमीवरून त्यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी ‘घे भरारी’ या चित्रपटातून प्रथमच आनंद काळे यांना मुख्य नायकाची भूमिका देऊ केली.

या चित्रपटातून कुलदीप पवार, रवी पटवर्धन, सुकन्या कुलकर्णी, ऐश्वर्या नारकर यांच्यासोबत अभिनयाची नामी संधी मिळाली. त्यानंतर आनंद काळे यांनी मागे वळून पाहिलेच नाही पुत्रकामेश्ठी, आबा जिंदाबाद, मुलगी झाली हो, पी से पीएम तक, जय मोहटादेवी, अग्निदिव्य, झक मारली बायको केली, स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्य सौदामिनी ताराराणी, मी तुझीच रे, तुझ्यावाचून करमेना, माझी तुझी रेशीमगाठ, लेक माझी दुर्गा, जिवलगा, चार दिवस सासूचे, आमच्या ही चं प्रकरण अशा अनेक मालिका, चित्रपट तसेच नाटकातून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवून दिली. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील कोंडाजी फर्जंद ही ऐतिहासिक भूमिका त्यांच्यासाठी अधोरेखित करणारी ठरली. या भूमिकेने आनंद काळे यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. कोल्हापूरच्या महानगरपालिकेने त्यांना स्वच्छ सर्वेक्षण २०२० चे ब्रँडअम्ब्यासीडर पद देऊ केले. अभिनय कारकिर्दीचा त्यांचा हा प्रवास यशस्वीपणे पार पाडत असतानाच त्यांनी २००० साली हॉटेल व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली. कोल्हापूर येथे त्यांनी ‘हॉटेल राजपुरुष’ नावाने हॉटेल सुरू केले. इथे स्थिरस्थावर होत असतानाच २००६ साली त्यांनी ‘महालक्ष्मी सिने सर्व्हिस’ या नावाने प्रॉडक्शन हाऊस उभारले. यातून वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंग साठी लागणारे कॅमेरे, लाईट्स, क्रेन, जनरेटर, व्हॅनिटी व्हॅन, लेबर पुरवले. यात प्रामुख्याने रात्रीस खेळ चाले, गाव गाता गजाली, बालगंधर्व, नटरंग, पोपट सारख्या चित्रपटांसाठी काम केले. दरम्यान हॉटेल राजपुरुष या हॉटेलला चांगली लोकप्रियता मिळू लागली. ही लोकप्रियता वाढत असल्याचे पाहून त्यांनी २०१२ साली ‘हॉटेल कार्निव्हल’ हे आणखी एक हॉटेल सुरू केले.

कोल्हापूर येथे कदमवाडी रोड , युनिक पार्क येथे हे कार्निव्हल हॉटेल अनेक खवय्यांची गर्दी खेचून आणताना पाहायला मिळाले. एवढेच नाही तर आनंद काळे यांच्या कुटुंबाचा ‘न्यू गणेश आर्ट’ नावाने गणपतीच्या मुर्त्या बनवण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायातूनही त्यांच्या कुटुंबाला चांगलेच उत्पन्न मिळते. कॉलेजमध्ये असल्यापासून आनंद काळे यांना फुटबॉल खेळाची आवड होती. यातूनच बायकिंग आणि रेसिंगमध्येही त्यांनी सहभाग दर्शवला होता. आनंद काळे यांचे लक्झरी बाईक आणि लक्झरी कार प्रेम त्यांच्या मित्रपरिवाराला चांगलेच परिचयाचे आहे. Kawasaki ninja 1000 ही बाईक त्यांनी काही वर्षांपूर्वीच खरेदी केली होती. या बाईकची किंमत १२ ते १५ लाख एवढी आहे. खऱ्या आयुष्यात लविश लाइफस्टाइल जगणाऱ्या आनंद काळे यांच्या लक्झरी गाड्यांमध्ये लँड रोव्हर या कारचाही समावेश आहे. त्यांचे हे लक्झरी गाड्यांचे प्रेम आता त्यांच्या चाहत्यांनाही नक्कीच माहीत झाले असणार. बॉलिवूड आणि टॉलिवूड सृष्टीत असे लाइफस्टाइल जगणारे अनेक कलाकार तुम्हाला आढळतील मात्र मराठी सृष्टीत असे लाइफस्टाइल जगणारे आनंद काळे यांच्यासारखे खूप कमी कलाकार आढळतील. या यशाबद्दल आनंद काळे यांचे निश्चितच कौतुक करायला हवे.