‘माझा छकुला’ चित्रपट साकारताना हि अभिनेत्री इतकी आजारी पडली कि… चित्रपट सृष्टीतून गायब झालेली हि अभिनेत्री पहा सध्या काय करते

‘माझा छकुला’ हा १९९४ सालचा गाजलेला चित्रपट. या चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते हे विशेष. आदिनाथ कोठारेचा बालभूमिकेतला हा पहिला चित्रपट. महेश कोठारे यांनी त्यांच्या चित्रपटातून आदिनाथला कलाकार म्हणून लॉन्च केले त्याचप्रमाणे अनेक नवख्या कलाकारांनाही त्यांनी अभिनयाची संधी मिळवून दिली. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी खोपकर. माझा छकुला या चित्रपटात त्यांची जोडी जुळली ती अभिनेत्री हेमांगी खोपकर हिच्यासोबत. आज या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…. हेमांगी खोपकर या मूळच्या रायगडच्या. रायगड जिल्ह्यातील पेण शहरात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना आठवी इयत्तेत असताना त्यांनी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात राजाराम राजेंची बालपणीची भूमिका साकारली होती. पण पुढे जाऊन या क्षेत्रात काम करावे याचा त्यांच्या आईवडीलांनी कधी विचारच केला नव्हता.

एकदा त्या नाटक बघायला गेल्या असताना प्रभाकर पणशीकर यांनी त्यांना येसूबाईची भूमिका देऊ केली होती. पण नाटकाच्या दौऱ्यामुळे शिक्षण अर्धवट राहील म्हणून मग त्यांनी नाटकात काम करायला नकार कळवला होता. पुढे एका साड्यांच्या जाहिरातीत त्यांना झळकण्याची संधी मिळाली. वर्षा उसगावकर, जयश्री गडकर यांच्यासोबत जाहिरातीत झळकल्याने पेण वासीयांमध्ये एक कमालीची उत्सुकता होती. ही जाहिरात संध्याकाळच्या बातम्यावेळी लागायची, तेव्हा ही जाहिरात बघण्यासाठी पेणच्या रस्तावर शुकशुकाट असायचा. दिसायला अतिशय देखण्या असलेल्या हेमांगीला या जाहिरातीमुळेच मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. यातूनच पुढे त्यांचे मोठ्या पडद्यावरही पाऊल पडले. माझा छकुला या चित्रपटात त्यांना महेश कोठारेची नायिका बनण्याची संधी मिळाली. पण त्याचदरम्यान हेमांगी खोपकर यांनी विनोद राव यांच्यासोबत लग्न केले होते. चित्रपटात त्यांची भूमिका मोठी होती.

अगदी महेश कोठारे यांच्यासोबत एक रोमँटिक गाणंही शूट होणार होतं पण त्यावेळी हेमांगी खूपच आजारी पडल्या. थोडसं शूटिंग झालं की त्या पुन्हा आजारी पडायच्या. यामुळे महेश कोठारे यांनी सहकार्य दाखवत त्यांची भूमिका छोटी केली. आराजपणामुळे त्यांच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळाला नसल्याची खंत त्या आजही व्यक्त करतात. पण या चित्रपटानंतर हेमांगी खोपकर यांनी अनेक चित्रपट, मालिकेतून काम केले. सध्या त्या आपल्या कुटुंबासोबत वाशीमध्ये राहायला आहेत. मध्यंतरी बोकड, गोट्या सारख्या चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. मिहीर आणि कश्मिरा अशी दोन अपत्ये त्यांना आहेत. तर त्यांची नणंद ‘सुनीता राव’ याही हिंदी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.