इंडियन आयडॉलच्या पहिल्या सिजनमध्ये अंतिम पाचच्या यादीत मराठमोळा गायक राहुल वैद्य याने स्थान मिळवले होते. इंडियन आयडॉलमध्ये सहभागी झालेल्या राहुलने उपविजेतेपद पटकावले होते. या शोमुळे अमाप प्रसिद्धी मिळालेल्या राहुलने पुढे जाऊन बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटातील गाणी गायली. याशिवाय अल्बम आणि अनेक रिऍलिटी शोमधूनही त्याने गाणी गायली आहेत. नुकतेच नवरात्रीच्या दिवसात म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी त्याचे “गरबे की रात..” हे गाणं रिलीज करण्यात आलं. हे गाणं राहुल वैद्य आणि गायिका भूमि त्रिवेदी यांनी गायलं आहे.

या व्हिडीओ सॉंग मध्ये अभिनेत्री निया शर्मा आणि राहुल वैद्य एकत्रित झळकले आहेत. ह्या गाण्याच्या प्रमोशनसाठी निया आणि राहुल वैद्य हिंदी बिग बॉसच्या १५ व्या सिजनमध्ये दाखल झाले होते तिथे त्यांच्या गाण्याच्या तालावर स्पर्धकांनी ठेका धरत गरबा खेळला होता. गरबे की रात हे राहुलचं गाणं लोकप्रिय होत असतानाच नुकताच ह्या गाण्यावर काही जणांनी आक्षेप नोंदवला आहे. आक्षेप नोंदवणाऱ्यांचे म्हणणे आहे की राहुलने त्याच्या गाण्यात ‘ श्री मोगल माँ’ चा उल्लेख केला आहे. गुजरातमध्ये आई मोगल माँ ची पूजा अर्चा केली जाते तिचे नाव तुमच्या गाण्यात घेतल्याने आम्हा भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत असे आक्षेप नोंदवणाऱ्यांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर भावना दुखावलेल्या भक्तांनी या गाण्याला जोरदार विरोध दर्शवला आहे तर राहुल वैद्यवर देखील त्यांनी टिका कली आहे. हा विरोध झाल्यापासून राहुलला धमकीचे फोन देखील येऊ लागले आहेत. आणि त्याच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल करू असा इशारा देण्यात येत आहे. यावृत्ताला प्रयोजकांकडून नुकताच दुजोरा मिळाला आहे.

प्रयोजकांनी सांगितले की हो ही बातमी खरी आहे आणि राहुल वैद्यला कालपासून खूप सारे धमकीचे मेसेज आणि फोन येऊ लागले आहेत. शिवाय अनेक विरोधकांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. प्रयोजकांनी या बातमीचे स्पष्टीकरण देत सांगितले की, विरोध दर्शवण्याऱ्या भक्तांना आम्ही विनंती केली आहे की गाण्यात बदल करण्यासाठी आम्हाला आणखी थोडा वेळ द्या. परंतु असे असले तरी आमच्या गाण्यात आम्ही आई मोगल माँ चे नाव तितक्याच आदराने घेतलं आहे. यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू मात्र अजिबात नव्हता. यातून एका विशिष्ट समूहाच्या लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही त्यांची क्षमा मागतो. हे गाणं सुधारण्यासाठी आम्हाला काही वेळ लागणार आहे त्यात बदल करण्यासाठी त्यांनी आम्हाला अजून काही वेळ द्यावा ही विनंती आम्ही त्यांना करू इच्छितो. दरम्यान राहुल वैद्यने या बातमीबाबत मीडियाला अजून कुठले स्पष्टीकरण दिले नाही.