मागील काही महिन्यांपूर्वी अभिनेता आस्ताद काळे ने सोशल मीडियावर ‘माझ्याकडे काम नसल्याची’ पोस्ट शेअर केली होती. त्यावर त्याला सोबोध भावे आणि ऋतुजा बागवे अभिनित चंद्र आहे साक्षीला या मालिकेत संग्रामची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. आस्तादने यागोदरही नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारून आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली होती. मुळात कलाकारांकडे काम नाही ही त्यांना स्वतःला सांगायची जेव्हा वेळ येते तेव्हा अगोदरच्या पिढीतल्या कलाकारांनी हे सांगायला कुठले मध्यम वापरले असावे?

हा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतो. कारण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तर ते सांगणे सहज शक्य झाले आहे आणि त्या गोष्टीची तितक्याच आपुलकीने दखल घेण्यात येते हे विशेष… आस्ताद काळे प्रमाणे आता मराठी सृष्टीतील आणखी एका अभिनेत्रीने माझ्याकडे काम नसल्याचे सांगितले आहे. अर्थात फेसबुकच्या माध्यमातून तिने यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे त्याबाबत जाणून घेऊयात… या अभिनेत्रीचे नाव आहे “शाश्वती पिंपळीकर”. बालक पालक या चित्रपटात शाश्वती मुख्य भूमिकेत झळकली होती. परी, चाहूल या टीव्ही सिरीज तसेच हेडलाईन अशा काही प्रोजेक्टमधून ती या मराठी सृष्टीत तग धरून होती. गेल्या वर्षी १७ डिसेंबर २०२० रोजी शाश्वती फोटोग्राफर आणि इंटेरिअर डिझायनर असलेल्या राजेंद्र करमकर सोबत विवाहबद्ध झाली होती. लग्नानंतर मात्र आता तीने कला क्षेत्रात पुनरागमन करण्याचे ठरवले आहे यासंदर्भात तिने पोस्टमध्ये लिहिले की “नमस्कार, माझं नाव शाश्वती पिंपळीकर. मी एक अभिनेत्री असुन चांगला सिनेमा, सिरियल, वेबसीरीज करुइच्छीत आहे. तेव्हा मी करण्या योग्य काम कोणाकडे असेल तर संपर्क साधा ” असे म्हणून ति पुन्हा अभिनय क्षेत्रात येण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

चंदेरी दुनियेत टिकून राहायचं असेल तर तुम्हाला गॉडफादर लागतो असे म्हणतात. परंतु शाश्वतीच्या बाबतीत असे काहीच घडले नाही उलट घरात टीव्ही नसल्याने ती या क्षेत्रात कधी उतरेल याचा विचारही तिने केलेला नव्हता या सृष्टीत काम करत असताना मागील १० वर्षाच्या कारकिर्दीत तिला अनेक दिग्गज कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. या संधीचा कुठेतरी फायदा होईल किंवा करिअरच्या दृष्टीने पुनरागमन करता येईल या हेतूने तिने ही पोस्ट लिहिली आहे. अर्थात आस्तादने दाखवलेला काम मिळवण्यासाठीचा हा नवा मार्ग त्या कलाकारासाठी कितपत यशस्वी ठरतो हे येत्या काळातच स्पष्ट होईल परंतु हे धाडस दाखवण्यासाठीही तितकीच जिगर लागते हेही खरे. न घाबरता न डगमगता काम मिळवण्यासाठी कलाकारांची ही धडपड नक्कीच इतरांसाठी देखील आशादायी म्हणावी लागेल. अभिनेत्री “शाश्वती पिंपळीकर” हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा…