अभिनेत्री विशाखा सुभेदार ही मराठी सृष्टीत विनोदी अभिनेत्री म्हणून जास्त परिचयाची आहे. फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्य जत्रा या आणि आशा कित्येक शोमधून विशाखाने आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर सुरुवातीच्या काळात विशाखाने घरोघरी जाऊन मार्केटिंगचे काम केले होते. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमुळे विशाखाला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. इथूनच तिच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळत गेली.

झपाटलेला 2, मस्त चाललंय आमचं, येड्यांची जत्रा, अरे आवाज कोणाचा, सासूच स्वयंवर, दगडाबाईची चाळ, ये रे ये रे पैसा अशा अनेक चित्रपटातून तिला महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. बहुतेक शोमधून विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले यांच्या जोडीने धमाल उडवून दिलेली पाहायला मिळाली. गेल्या कित्येक वर्षांपासून या दोघांची जोडी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. अभिनयासोबतच विशाखा उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे हे बहुतेकांना माहीत नसावे. नालंदा डान्स रिसर्च सेंटर येथून तिने नृत्याचे धडे गिरवले आहेत. बहुतेकवेळा तिच्या नृत्याची झलक कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. १ जून १९९८ साली विशाखाने अभिनेते महेश सुभेदार यांच्याशी विवाह केला. महेश सुभेदार हे मराठी नाट्य तसेच चित्रपट अभिनेते म्हणून ओळखले जातात. तक्षक याग, लगी तो छगी, बेधुंद, अशी ही भाऊबीज, ही पोरगी कोणाची या आणि अशा मोजक्या नाटक आणि चित्रपटातून त्यांनी अभिनय साकारला आहे. विशाखा आणि महेश सुभेदार आंबरनाथ येथे स्थायिक आहेत. अभिनय हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. अभिनयाला सुद्धा आपल्या आई वाडीलांप्रमाणे ऍक्टिंगची आवड आहे आणि त्याचे धडे देखील तो गिरवत आहे. या संपूर्ण कलाकार कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…