झी मराठी वाहिनीवरील पाहिले न मी तुला या मालिकेतील अभिनेत्रीचा नुकताच भीषण अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. ह्या अभिनेत्री आहे वर्षा दांदळे. वर्षा दांदळे यांनी पाहिले न मी तुला या मालिकेत उषा मावशीची भूमिका साकारली होती. आजवर त्यांनी साकारलेल्या भूमिकांचे प्रेक्षकांनी नेहमीच कौतुक केले आहे. वर्षा दांदळे यांनी आपल्या अपघाताची बातमी नुकतीच इन्स्टाग्राम वर शेअर केली आहे. त्यात या अपघाताने त्यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याचे दिसून येते. या अपघातात त्यांच्या पाठीला जबरदस्त दुखापत झाली आहे त्यामुळे मणक्याच्या त्रास त्यांना वाटू लागला आहे शिवाय उजव्या पायाला देखील गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातामुळे त्यांची परिस्थिती देखील खूपच नाजूक झाली असल्याचे त्या सांगतात. सध्या कुठलीच हालचाल होत नसल्याने त्या आता झोपूनच आराम करत आहेत. यातुन त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी ईच्छा त्यांच्या चाहत्यांनी केली आहे. वर्षा दांदळे या मूळच्या अकोल्याच्या आहेत लग्न करून त्या मुंबईत स्थायिक झाल्या. अभिनयाचा त्यांचा प्रवास खूपच उल्लेखनीय असाच आहे. संगीत शिक्षिकेची नोकरी करत असताना त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. प्रेक्षकाना त्यांच्या भूमिका खूप आवडू लागल्या. पुढे झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली वच्छी अत्याची भूमिका खूपच गाजली होती. याच नावाने त्यांना ओळख देखील मिळाली होती. शिवाय वच्छी आत्या लग्न जुळते म्हणून खऱ्या आयुष्यात अनेकांनी त्यांच्याकडे लग्न जुळवून देण्यासाठी पत्रिका आणून दिल्या होत्या. १९९९ साली त्यांनी नाटकाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते २००५ साली वच्छी आत्याच्या भूमिकेने त्यांचे या क्षेत्रात येणे सार्थकी ठरले.

पुढे नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत त्यांनी लता काकूची भूमिका साकारली मग घाडगे आणि सूनमधील सुकन्या कुलकर्णीची मोठी जाऊ आणि मलवणी डेज मधली मालवणी काकू अशा त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना खूपच भावल्या. कृपा-सिंधू या स्वामी समर्थांच्या मालिकेतील सुंदरा बाई या भूमिकेने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. हा सर्व प्रवास चालू असताना आज त्यांच्यावर मोठे संकट ओढवलेले दिसत आहे. सध्या अपघातामुळे आणि गंभीर दुखापतीमुळे त्या अंथरूनाला खिळून असल्या तरी त्या तितक्याच तत्परतेने लवकरच रिकव्हर होतील अशी आशा आहे. “आपकी दुवा कि जरुरत हे” म्हणत त्यानी सोशिअल मीडियावर चाहत्यांना प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांचे चाहते देखील त्या लवकरात लवकर बऱ्या होतील अशी कमेंट करताना पाहायला मिळत आहेत.