स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आजवर सुप्रिया पाठारे यांनी विनोदी, गंभीर आणि खलनायिकेच्या भूमिका आपल्या अजग अभिनयाने रंगवलेल्या आहेत मात्र इथपर्यंत येण्याचा त्यांचा प्रवास मात्र खूप खडतर होता. एकूण चार भावंडात सुप्रिया थोरल्या असल्याने घरखर्चाला हातभार म्हणून रस्त्यावर अंडी, चणे विकायला जायच्या. तर कधी दुधाच्या बाटल्या घरोघरी नेऊन पोहोचवायला लागायच्या. यासोबतच शाळेचा देखील अभ्यास करावा लागायचा त्यामुळे दिवसभर खूप धावपळ व्हायची.

अभिनेत्री अर्चना नेवरेकर या सुप्रिया पाठारे यांची सख्खी बहीण. अर्चना नेवरेकर बालपणापासूनच नाटकात सहभागी व्हायची पुढे मालिका मिळाल्या त्यावेळी बॉडीगार्ड म्हणून सुप्रिया तिच्या सोबत जायची. या कामाचे सहजम्हणून ती सुप्रियाला १०० रुपये द्यायची. सुप्रिया पाठारे यांना डान्सची आवड होती तेव्हा ९वी इयत्तेत शिकत असताना वेदांती मेहेंदळे ही त्यांची मैत्रीण अर्चना पालेकर यांच्याकडे भरतनाट्यम शिकायला जायची. त्यावेळी डान्स क्लास करायचा असं ठरवलं मात्र त्याची फी ७० रुपये होती. आईला सांगितल्यावर ७० रुपये देणार नाही असं तिनं बजावून सांगितलं मग वेदांती मेहेंदळे हिच्याकडे भांडी घासायचं काम केलं त्याचे महिन्याला १०० रुपये मिळायचे क्लासची फी ७० रुपये देऊन उरलेले ३० रुपये आईला द्यायचे यातून आई पण खूप खुश व्हायची. परंतु भरतनाट्यम शिकताना खूप त्रास व्हायचा कारण आई आणि सुप्रिया दोघी मिळून १८ घरची भांडी घासायच्या. त्यामुळे साहजिकच डान्स करताना ती एनर्जी कमी पडू लागली. पण तरी देखील ती आवड म्हणून त्यावर लक्ष केंद्रित करू लागली.

एकदा शाळेत असताना एका शिक्षिकेची नक्कल करत असताना नेमके बाईंनी पाहिले त्यावेळी त्यांनीच नाटकात काम करण्याचे सुप्रियाला सुचवले. ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकात काम करण्याची सुप्रियाला संधी मिळाली. मग पुढे अनेक नावाजलेल्या कलाकारांसोबत काम करत असताना अभिनय क्षेत्रात जम बसू लागला. फु बाई फु, जागो मोहन प्यारे, मोलकरीणबाई, श्रीमंताघरची सून, ची व ची सौ कां, बाळकडू अशा चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू पाहायला मिळाले. मग सहनायिका असो वा विरोधी भूमिका असो किंवा फु बाई फु सारख्या विनोदी भूमिका त्यांनी सहजतेने साकारलेल्या पाहायला मिळाल्या. या प्रवासात त्यांना आई वडिलांचा भक्कम पाठिंबा मिळालाच शिवाय सासरकडच्या मंडळींनी देखील प्रोत्साहन देण्याचे काम केले त्यामुळेच आज ह्या यशापर्यंत आपण पोहोचू शकलो असं त्या म्हणतात.