
कलाकारांच्या लग्नाची धामधूम अजूनही सुरू आहे. यंदा अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. कुणी मनोरंजन विश्वातीलच जोडीदार पसंत केला आहे तर कुणी आपल्यापेक्षा वेगळया क्षेत्रातील जोडीदाराशी गाठ बांधली आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील अमृता पवार हिच्या पाठोपाठ आता अभिनेत्री रूपल नंद हिनेही लग्नाची बातमी दिली आहे. मुंबईच्या अनिश कानविंदे याच्यासोबत रूपलने सप्तपदी घेतली आहे. रूपलने तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पण रूपलने अचानक दिलेल्या लग्नाचा बातमीचे चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. गेल्या काही दिवसांपासून रूपलच्या लग्नाची धूम सुरू होती. हळदी, मेहंदी या सोहळ्यासाठी रूपलने खास लुक केला होता. कुटुंबीय, नातेवाइक आणि जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत रूपलचा विवाह पार पडला. यावेळी तिचा श्रीमंताघरची सून या मालिकेतील नायक यशोमान आपटे लग्नाला आला होता आणि त्यानेही लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत. गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये रूपल खूपच सुंदर दिसत होती. तर हळदीसाठी तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. गोठ या मालिकेतून राधा ही भूमिका साकारात रूपल नंद छोट्या पडद्यावर आली. या मालिकेतील तिची भूमिका खूप गाजली. अन्यायाविरोधात आवाज उठवणारी मुलगी अशी तिची भूमिका होती. त्यानंतर श्रीमंताघरची सून या मालिकेतील अनन्या या भूमिकेलाही रूपलने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत त्यामुळे तिला एकामागून एक चांगल्या भूमिका मिळत गेल्या.

मुंबई पुणे मुंबई या सिनेमाच्या तिसऱ्या सीझनमध्ये रूपलने साकारलेली मुक्ता बर्वेच्या बहिणीची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली. मोजक्या भूमिका करून रूपलने मनोरंजनविश्वात तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अभिनेत्री म्हणून टीव्हीवर येण्यापूर्वी रूपल डेस्टिस्ट आहे. त्यामुळे डॉक्टर असूनही तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं ते या क्षेत्राविषयी असलेल्या आवडीमुळेच. मूळची पुण्याची असलेल्या रूपलची रूपेरी दुनियेतील एन्ट्री केली ती श्रावणक्वीन या सौंदर्य स्पर्धेने. बेस्ट पर्सनॅलिटी या विभागातील बक्षीस रूपलच्या नावावर कोरले गेले आणि त्यानंतर तिला अभिनय क्षेत्राची दारे खुली झाली. अभिनेत्री रूपात नंद हिला आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…