काही दिवसांपूर्वी मृणाल दुसानिस हिने तिच्या सोशल अकाउंटवरून लवकरच आई होणार असल्याचे जाहीर केले होते. मृणाल आणि नीरज मोरे सध्या परदेशात स्थायिक आहेत मात्र लवकरच ती भारतात येईल असे बोलले जात होते. २४ मार्च २०२२ रोजी मृणाल आणि नीरज मोरे यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. काही वेळापूर्वीच तिने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. Daddy’s little girl अँड mumma’s whole world..!!! Our little princess has arrived…!!! असे म्हणत मृणालने ही आनंदाची बातमी सांगितली आहे. अभिनेत्री मृणालने तिच्या लेकीचे नाव देखील जाहीर केले आहे.

‘नुरवी’ हे तिच्या नुकत्याच जन्मलेल्या लेकीचं नाव आहे. नुरवीचा अर्थ देखील खूपच सुरेख आहे. नुरवी म्हणजे फुलांचा सुगंध, दुःखाचा नाश करणे असा होतो. नूरवी म्हणजे न उरवी सगळी संकटे, दुःख न उरवणारा . आपल्या आयुष्यात नवीन चैतन्य निर्माण करणाऱ्या लेकीचं नाव नूरवी असावं हे मृणाल आणि निरजने अगोदरच ठरवून ठेवलं होतं. आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी सृष्टीतील सोज्वळ नायिका म्हणून मृणाल दुसानिस हिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, अस्स सासर सुरेख बाई, हे मन बावरे या मालिकांमधून मृणालने मुख्य भूमिका बजावल्या आहेत. कुठलाही आरडाओरडा न करता, अभिनयाचे आढेवेढे न घेता केवळ चेहऱ्यावरील हावभावावरून अभिनय साकारून या अभिनेत्रीने अनेकांना भुरळ घातली आहे. मृणाल दुसानिस ही मूळची नाशिकची. नाशिक येथेच तिचे पदवीचे शिक्षण झाले आणि पत्रकारितेची पदवी देखील प्राप्त केली. पण अभिनयाची विशेष आवड असल्याने तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यात तिला यश देखील मिळालं. मालिकांमधून मुख्य भूमिका निभावत असतानाच २५ फेब्रुवारी २०१६ रोजी नीरज मोरे यांच्याशी मृणालचा विवाह झाला.

नीरज मोरे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून यूएसमध्ये टेक्सास सिटी येथेच ते कार्यरत आहेत. मृणाल अभिनयासोबतच उत्कृष्ट गायिका देखील आहे. आपल्या लग्नात मृणालने गाणे गायची हौस पूर्ण करून घेतली होती. तिच्या लग्नातला गाणं गातानाचा एक व्हिडीओ यु ट्यूबवर पाहायला मिळेल. लग्नानंतर मृणालचा पती नीरज मोरे यूएसलाच वास्तव्यास असल्याने या कारणास्तव बऱ्याचदा मृणालला मुंबई ते अमेरिका असा प्रवास करावा लागायचा. मालिकेचे शूटिंग आटोपून ती तिच्या नवऱ्याला भेटायला अमेरिकेला जायची. मधल्या काळात अस्स सासर सुरेख बाई या मालिकेतून एक्झिट घेऊन ती अमेरिकेत गेली होती. तर त्यानंतर हे मन बावरे या मालिकेतील लीड रोलमुळे पुन्हा मायदेशी परतली होती. हे मन बावरे या मालिकेने खूप दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला तेव्हा ती पुन्हा अमेरिकेत स्थायिक झाली. मृणालला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे त्यामुळे तिच्यावर चाहत्यांनी अभिनंदनाचा भरभरून वर्षाव केला आहे. मृणालला कन्यारत्न प्राप्तीच्या आणि सुदृढ आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!