मराठी मनोरंजन क्षेत्रात सतत काहीतरी वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेणारी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या विळख्यात सापडली आहे. यापूर्वीही केतकीने सोशल मीडियावर काही ना काही वाद निर्माण करणाऱ्या पोस्ट करून पोलिसस्टेशनची पायरी गाठली आहे. पण नुकतीच तिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात पोस्ट केलेली अपमानास्पद कविता तिला चांगलीच भोवण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केतकीला चांगलाच दम भरला आहे. काल तिला अटक देखील करण्यात आली आहे.

तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक अशा शब्दातील कविता केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक पेजवर पोस्ट केली. शरद पवार यांची साताऱ्यात सभा झाली. त्या सभेत पवार यांनी सादर केलेल्या कवितेत कष्टकऱ्यांच्या व्यथा व ब्राम्हणांची वृत्ती यावर भाष्य केले होते. त्या कवितेचा संदर्भ देत केतकीने शरद पवार यांच्यावर व्यंगात्मक भाष्य केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केतकीवर गुन्हा दाखल केला आहे. केतकीच्या या पोस्टवर आता जितेंद्र आव्हाडही भडकले आहेत. ते असं म्हणाले आहेत, केतकी चितळे हिने महिला असल्याचा गैरफायदा घेऊ नये. शरद पवार यांच्याशी राजकीय दृष्टीने लढा द्यावा. पण केतकीची ती लायकीच नाही. शरद पवार यांच्या शारीरीक व्यंगावर अत्यंत खालच्या पातळीवर बोलणाऱ्या केतकी चितळे हिने तिचे वय आणि अनुभव किती आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गप्प आहेत तोपर्यंत ठिक आहे, पण त्यांनी आता केतकीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. केतकी इतकी विकृत असेल असे वाटले नव्हते. जे शब्द तिने शरद पवार यांच्याविषयी लिहिले आहेत तेच शब्त केतकीच्या वडील किंवा आजोबांविषयी लिहिले तर तिला ते सहन होतील का? शरद पवार हे आमचे बाप आहेत, त्यांच्याविषयी असा अपमान राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता सहन करणार नाही. त्यामुळे केतकीने जी काही बरळ ओकली आहे त्याच्या परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवावी.

शरद पवार यांच्याविषयी केलेले विधान केतकीच्या चांगलच अंगाशी येणार आहे असं वातावरण पेटलं आहे. केतकीने यापूर्वी नवबौध्द ६ डिसेंबरला फुकटचे मुंबई दर्शन घेण्यासाठी मुंबईत येतात असं विधान करून वाद ओढवून घेतला होता. त्यावेळी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर शिवप्रेमी केवळ शिवाजी महाराजांच्या कार्याचा देखावा करतात असे म्हणून वाद ओढवून घेतला होता. आता शरद पवार यांच्यावर अपमानास्पद पोस्ट करून केतकी चर्चेत आली आहे. तुझं माझं ब्रेकअप या मालिकेतून केतकी चितळे लोकप्रिय झाली. त्यानंतर लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेतही केतकी दिसली होती. केतकीला फिट येण्याचा आजार आहे. याच कारणाने तिला लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. तेव्हा केतकीने निर्मात्यांविरोधात तक्रार केली होती.