सोशलमीडियावर जिचे अडीच मिलियन्स फॉलोअर्स आहेत, टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय चेहरा असा किताब जिला मिळाला आहे आणि फक्त तीन मालिका करून जिने तिचा स्वत:चा फॅनफॉलोइंग वाढवला आहे अशा हृता दुर्गुळे हिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओवर तिचे चाहते फिदा असतात. सोशलमीडियावरील सर्वात जास्त फॉलोअर्स असलेली मराठी अभिनेत्री हा टॅगही नुकताच हृताला मिळाला आहे. मग आपल्याला इतका सपोर्ट करणारे, आपल्या प्रत्येक भूमिकेला प्रच्ंड प्रतिसाद देणार्या चाहत्यांसोबत जेव्हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट शेअर केली तर त्यासाठीही आपल्याला शुभेच्छाच मिळतील अशी हृताची आशा मात्र सोशलमीडियावर तिला केलेल्या ट्रोलिंगने साफ फोल ठरवली. हिंदी टीव्ही मालिका दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत जेव्हा तिने लग्नाचा निर्णय घेतला आणि त्याची पोस्ट सोशलमीडियावर शेअर केली तेव्हा तिला चक्क नेटकर्यांनी स्वार्थी म्हटलं.

इतकच नव्हे तर हिंदी मालिकेत संधी मिळावी यासाठी प्रतीक शाहची जोडीदार म्हणून निवड केल्याच्या कमेंट तिला आल्या. प्रतीकच्या नात्यावरून आलेला हा वाईट अनुभव हृताने किचन कल्लाकार या शोमध्ये सांगितला. अभिनेता संकर्षण कर्हाडे निवेदन करत असलेला किचन कल्लाकार हा शो सध्या गाजत आहे. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी कलाकार त्यांचे पाककौशल्य दाखवतात. यासोबतच संकर्षण कलाकारांना बोलतं करून त्यांच्या आयुष्यातील काही किस्सेही सांगायला लावतो. याच शो सध्या मन उडू उडू झालं या मालिकेतील कलाकार आले होते ज्यामध्ये हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊतही होता. हृता दुर्गुळे ही सोशलमीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. नवीन लूक असो किंवा पार्लरमधील ब्युटी ट्रीटमेंटचे रिल्सही ती नेहमी शेअर करत असते. गेल्यावर्षीच तिने स्वत:चा फ्लॅट घेतला त्याची होमटूरही खूप व्हायरल झाली होती. त्यामुळेच संकर्षणने हृताला असे विचारले की तू सोशलमीडियावर इतकी अॅक्टीव्ह असतेस, तर तुला या माध्यमातील खटकलेली गोष्ट कोणती आहे? याच प्रश्नावर हृताने प्रतीकसोबत लग्नाच्या निर्णयावर तिला चाहत्यांकडून आलेला वाईट अनुभव शेअर केला. सोशल मीडियावर माझा फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे. माझ्या खासगी आयुष्याबद्दल मी सोशल मीडियावर व्यक्त होत नाही. माझे सोशल मीडियावर 23 लाख फॉलोअर्स आहेत. त्यामुळे माझ्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल चाहत्यांना सांगावं अशी माझी इच्छा होती. ते माझ्या कुटुंबाप्रमाणे आहेत असं समजून मी प्रतीक शाहसोबतच्या साखरपुड्याची माहिती चाहत्यांना दिली. प्रतीक हिंदी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमधला आहे. माझ्या आयुष्यातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब मी सोशल मीडियावरील चाहत्यांसोबत शेअर केली.

मात्र त्यावरूनच त्यांनी मला ट्रोल केलं. मराठी अभिनेत्री नेहमी हिंदी इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांसोबतच लग्न का करतात, असं ते म्हणाले. मला हिंदी टीव्ही शोजमध्ये काम करायचंय, म्हणून मी प्रतीकसोबत लग्न करतेय, अशीही टीका माझ्यावर झाली. काहींनी त्याच्या लूकवरही कमेंट केली. हे सर्व अत्यंत निराशाजनक होतं”. अशा शब्दांत ती व्यक्त झाली. हृताने यावेळी चाहत्यांना विनंतीदेखील केली. अशा कमेंट्सने एखाद्याच्या भावना दुखावल्या जातात, त्यामुळे सोशल मीडियावर एखाद्याच्या पोस्टवर कमेंट करण्यापूर्वी विचार करा, असं ती म्हणाली. प्रतीक शाह हा ज्येष्ठ अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. मुग्धा यांच्यासोबत हृताने तिच्या दुर्वा या पहिल्या मराठी मालिकेत काम केले होते. प्रतीक हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. प्रतीकने ‘बेहद 2’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदगी’ यांसारख्या हिट टेलिव्हिजन मालिकांचं दिग्दर्शिन केलं आहे. प्रतीक हा उत्तम डान्सरसुद्धा आहे. त्याच्या डान्सचे व्हिडीओ तो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. जानेवारी महिन्यात हृताने प्रतीकसोबत दणक्यात साखरपुडा केला असून लवकरच ते लग्न करणार आहेत. सध्या हृता तिच्या मन उडू उडू झालं या मालिकेत काम करत आहे. तिचा अनन्या हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे.