
आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत अनघाची भूमिका साकारली अहे अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने. अनघा ही आपल्या सासूच्या म्हणजेच अरुंधतीची बाजू घेताना दिसते. आपल्याला जे पटतं ते ती उघडपणे बोलून दाखवते. वेळप्रसंगी ती तिचा नवरा अभिला देखील खडसावताना दिसते. त्यामुळे अनघाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. नुकताच स्टार प्रवाह वाहिनीचा पुरस्कार सोहळा पार पडला यावेळी स्टार प्रवाहवरील मालिकेतील कलाकारांनी नटून थटून येऊन रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्याची प्रत्येक कलाकार अतिरतेने वाट पाहत असतो त्यामुळे रेडकार्पेटवर देखील ही कलाकार मंडळी तितक्याच उत्साहात सजलेली पाहायला मिळाली.

अशातच अश्विनी महांगडे हिला आपल्या अनघाच्या भूमिकेबाबत आणि अवॉर्ड सोहळ्याबाबत विचारणा केली. अनघाची भूमिका लोकांना प्रचंड आवडली आहे या भूमिकेबाबत अश्विनी म्हणते की, अनघा हा समाजातील अशा मुलींचा चेहरा आहे ज्या मुली घटस्फोटित आहेत डिप्रेशन मध्ये आहेत त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरून समाजातील महिलांसाठी काम केलं आहे. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा लग्न करण्याची संधी येते त्यावेळेला स्वतःला शांत करून एका नवीन कुटुंबात समाविष्ट होणं ह्या सगळ्या गोष्टी अनघाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. दुःख येत राहतात परंतु त्यामुळे जगणं थांबत नाही हेच सांगण्याच काम अनघाने केलं आहे. जशा अनघाच्या आयुष्यात अनेक दुःख संकटं आली तसाच काळ माझ्याही आयुष्यात आला जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले. अनेक चढउतार अनुभवले. त्यावेळीही त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की आपण नेहमी कलाक्षेत्रासाठी स्वतःला वाहुन न्यावं जर मी हे करत नसते तर मी नक्कीच डिप्रेशन मध्ये गेले असते. तुम्ही दुःखी असाल, तुमच्यावर कितीही मोठं संकट जरी आलं तरी तुम्हाला एकच सांगेन की तुम्ही काम सोडू नका.

तुम्ही जितके कामात असाल तितके गुंतून राहता आणि वाईट विचार तुमच्यापासून दूर जातात. अनघाच्या भूमिकेने मला चांगली लोकप्रियता मिळाली आहे आमचं सेटवरच वातावरण देखील खूप छान असतं. मी नेहमी दौऱ्यावर असते, काही सामाजिक कार्यात गुंतलेली असते त्यामुळे आई कुठे काय करते या मालिकेचा सेट हेच माझ्यासाठी घर आहे जिथे मी माझं काम आटोपल्यावर निवांत झोप घेते. सेटवरची कलाकार मंडळी मला खूप साहाय्य करतात अगदी यश पासून मालिकेचे दिग्दर्शक देखील सेटवर हलकंफूलकं वातावरण निर्माण करतात त्यामुळे हे काम करायला प्रोत्साहन मिळते. अभिनेत्री असूनही समाजकार्य करणाऱ्या ह्या तरुण मराठी अभिनेत्रीला आमच्या संपूर्ण टीमकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा