रात्रीस खेळ चाले २ या मालिकेमधून शेवंताच्या भूमिकेमुळे अपूर्वा नेमळेकर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. खरं तर शेवंता याच नावाने तिला नवी ओळख मिळाली होती. मात्र रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या तिसऱ्या पर्वात तिच्या भूमिकेला पुरेसा वाव मिळत नव्हता. याशिवाय मालिकेतील कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत होती, तिच्या लठ्ठपणावर खिल्ली उडवली जात होती. एवढेच नव्हे तर केलेल्या कामाचे पैसेही मिळत नव्हते या कारणास्तव अपूर्वाने रात्रीस खेळ चाले ३ ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. शेवंताच्या भूमिकेने तिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती मात्र हा निर्णय घेताना मला त्रास होतोय असेही ती म्हणाली होती . त्यानंतर लवकरच मी नव्या भूमिकेतून तुमच्या समोर येईल असा विश्वास तिने तिच्या चाहत्यांना दिला होता.

अपूर्वा नेमळेकर आता लवकरच एका दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी मराठीवरील’स्वराज्य सौदामीनी ताराराणी’ या मालिकेत अपूर्वा ‘राणी चेनम्मा’ ची ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. सुरुवातीला या भूमिकेबाबत अपूर्वाला विचारण्यात आले त्यावेळी ती या भूमिकेबाबत साशंक होती की, मी या भूमिकेला न्याय देऊ शकेल की नाही? माझ्यासमोर खूप मोठे मानसिक आव्हान आले. पण मी ही भूमिका साकारण्याची ठरवले असे ती म्हणते… दरम्यान ही भूमिका स्वीकारण्याअगोदर राणी चेनम्माची व्यक्तिरेखा जाणून घेण्याची तिची इच्छा होती या व्यक्तिरेखेचा इतिहास तिने जेव्हा जाणून घेतला तेव्हा हे आव्हान स्वीकारण्याचा जबरदस्त आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला. आणि आपण ही भूमिका करणार असा ठाम निश्चय केला. ही भूमिका साकारताना वैयक्तिक पातळीवर, खूप मोठी नैतिक जबाबदारी जाणवत असल्याचे ती म्हणते. कारण अशा भूमिका साकारताना प्रेक्षक आपल्याला त्या व्यक्तिरेखेत पाहतात त्यामुळे चाहत्यांसाठी तो कलाकार एक आदर्श बनतो. आशा करते, ही भूमिका साकारताना प्रेक्षकांच्या अपेक्षेला मी खरी उतरेल. माझ्या आजवरच्या भूमिकांना प्रेक्षकांनी असिमीत प्रेम आणि आशीर्वाद दिलेत ते यापुढेही वृद्धिंगत होतील अशी आशा करते असे अपूर्वा नेमळेकरने म्हटले आहे.