
बहुतेकदा सर्वच कलाकारांना रात्री अपरात्री शूटिंग आटोपून घरी जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागते. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप असो किंवा चला हवा येऊ द्या मधील भारत गणेशपुरे या कलाकारांना रात्रीच्या प्रवासात असे वाईट अनुभव आलेले होते. आता असाच एक प्रसंग अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्याबाबत देखील घडला आहे. या घटनेबाबत सांगताना तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केलं आहे जेणेकरून त्यांनी या घटनेमध्ये बारकाईने लक्ष्य घालावे आणि सर्वसामान्यांची मदत करावी. काही वेळापूर्वीच अभिज्ञाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यात तिने हा अनुभव सांगताना म्हटले आहे की, आजकाल मी सोशल मीडियाचा खूप कमी वापर करते. परंतु माझ्यासोबत जे घडलं त्याबद्दल मला सर्वांना सांगायचं आहे जेणेकरून माझ्या पोस्टमुळे अशा घटना होण्यापासून तुम्ही सावध राहाल.

शूटिंग आटोपून मी १०.३० वाजता पॅकअप केलं होतं. कार नसल्याने मी रिक्षाचा पर्याय निवडला होता. पुढच्या ५ मिनिटात मी रिक्षात बॅग ठेऊन बसले. ठाण्यातील ११.१० ते ११.१५ च्या दरम्यान मी ठाण्यातील विवीयाना ब्रिजवर होते तेव्हा मागून बाईकवर दोन जण आले. मी रिक्षाच्या मधोमध बसलेली असताना त्यांनी माझा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. हाताला जोरात हिसका बसल्याने तो दुखू लागला. हा प्रकार ३ ते ४ सेकंद चालू होता. परंतु त्या बाईकवाल्यांना मोबाईल हिसकावण्यात यश आले. त्यानंतर मी त्या बाईकचा नंबर लिहून घेण्याचा विचार केला मात्र त्यावर नंबर प्लेट नव्हती. बाईकवरची दोन्ही मुलं साधारण विशीतली होती. त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत ते खूप दूर निघून गेले. अंधार असल्याने त्यांचे चेहरे नीट दिसत नव्हते. खूप उशीर झाला असल्याने आधी घरी पोहोचण्याचा विचार केला. या घटनेची मी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. मी एक नोकरदार असल्याने माझा सगळा डेटा मोबाईलमध्ये होता शिवाय अनेक महत्वाची कामे त्या मोबाईलमध्ये होत होती त्यामुळे मोबाईल अत्यंत गरजेचे वस्तू आहे.

मला माझ्या स्वतःच्या शहरात असुरक्षित वाटू लागलं आहे. दोन दिवसानंतर मी पुन्हा शूटिंगला गेले तेव्हा माझ्या आणखी दोन सहकलाकारांसोबत अशीच घटना घडली याचा अर्थ ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अशीच परिस्थिती आहे!. मी हे लिहिण्याचं कारण म्हणजे मुंबई पोलीस, मुंबई जीआरपी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली जावी. या भागात ही एक गंभीर समस्या बनली आहे. माझ्या आर्थिक परिस्थितीनुसार मी दुसरा मोबाईल खरेदी करू शकते मात्र बऱ्याच सामान्य माणसाला या गोष्टी परवडत नाहीत. या प्रकरणात कायदा अधिक कडक करण्यात यावा. तसेच रस्त्यांवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावले जावेत. या घटनेत मी माझा फोन गमावला पण जीवही धोक्यात येऊ शकतो. मी आशा करते की पुन्हा अशा घटना घडू नयेत आणि जर झालीच तर त्यावर कारवाई केली जावी ही मुंबईतील एका सर्वसामान्य नागरिकाची विनंती आहे!.