काही मराठी सेलिब्रिटींच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुकतेच मृणाल दुसानिस हिने देखील मुलगी झाल्याचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या पाठोपाठ आता ती परत आलीये मालिका अभिनेत्याने मुलगी झाल्याची बातमी शेअर केली आहे. ती परत आलीये ही झी मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेणारी ठरली होती. या मालिकेत हनम्याची भूमिका साकारणारा अभिनेता समीर खांडेकर याला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे.

नुकत्याच ६ एप्रिल रोजी जन्मलेल्या लेकीसोबतचा फोटो शेअर करून त्याने हा आनंद व्यक्त केला आहे. समीरच्या या गोड बातमीवर चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. काही महिन्यांपूर्वी समीरने पत्नीचे बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते. कुणीतरी येणार येणार गं असे म्हणत आई बाबा होण्याची ही चाहूल सुखावणारी आहे असे त्यांनी म्हटले होते. डिसेंबर २०१५ साली समीर खांडेकर आणि वैभवी राणे खांडेकर यांचा विवाह झाला होता. वैभवी राणे खांडेकर हिने पाटकर वर्दे कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. ‘आपली सोसल वाहिनी’ या सेगमेंट मधून अनेक मजेशीर व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याचे दिग्दर्शन आणि लेखन स्वतः समीर खांडेकर याने केले असून त्याची पत्नी वैभविने निर्माती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आजवर या व्हिडिओजना प्रेक्षकांकडूनही खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला आहे. समीर खांडेकर,शशांक केतकर, ऋतुजा बागवे, मिहीर राजदा, पल्लवी पाटील असे बरेचसे कलाकार या नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून झळकले आहेत.

झी मराठीवरील काहे दिया परदेस या मालिकेतून समीर खांडेकरने वेणूगोपालची दाक्षिणात्य भाषेचा बाज असलेली भूमिका त्याच्या अभिनयाने सुरेख रंगवली होती. मालिकेतून वेणूचे पात्र धमाल मजामस्ती करणारे होते त्यामुळे ही भूमिका उठावदार ठरली होती. वैजू नं १ या स्टार प्रवाहवरील मालिकेत समीर मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला होता. तारक मेहता का उलटा चष्मा या लोकप्रिय हिंदी मालिकेतूनही तो एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला.शिवाजी कॉलेज तसेच भवन्स कॉलेजमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले होते. अभिनयाची आवड असल्याने नाटक, मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. बहुतेक मालिकेतून त्याच्या वाट्याला विनोदी भूमिकाच आलेल्या पाहायला मिळाल्या.