अंकुश चौधरी हा मराठी सृष्टीतील लोकप्रिय सुपरस्टार आहे. ‘सुना येति घरा’ या चित्रपटातुन त्याचे मोठ्या पडद्यावर आगमन झाले होते. स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा या रिऍलिटी शोमध्ये तो परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. विकेंडच्या भागात आदेश बांदेकर यांनी नुकतीच हजेरी लावली आहे. या दरम्यान अंकुश चौधरीचा स्ट्रगल कसा होता ही आठवण सांगताना आदेश बांदेकर खूपच भावुक झालेले पाहायला मिळाले. त्यावेळी आदेश बांदेकर यांनी भावुक होऊन सांगितलं की, “अंकुशला चालू तालमीतून बाहेर काढलं होतं”….

याची आठवण सांगताना अंकुश चौधरी म्हणाला की, “स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पैसे भरायचे होते पण पुरेसे पैसे नसल्याने भाजीचा धंदा सुरू केला त्यावेळेला चांगले मित्र मिळाल्यानंतर आयुष्याचं काय होऊ शकतं हे आम्ही बघितलंय” अशी एक गोड आठवण त्याने यावेळी उघड केली. तेव्हा आदेश बांदेकर अधोरेखित करून म्हणतात की,” फक्त टॅलेंट आणि अथक मेहनतीच्या जोरावर हे सुपरस्टार पद अंकुशला मिळालेलं आहे”. परळची आर.एम. भट ही अंकुश चौधरीची शाळा. शाळेत दरवर्षी तो वार्षिक स्नेहसंमेलनात सहभागी व्हायचा. केदार शिंदे त्याच शाळेत असल्याने आणि महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमातील काहीतरी सादर करून तो नेहमीच ‘अ’ वर्गासाठी बक्षीस मिळवायचा. त्यामुळे ब वर्गात असलेल्या अंकुशची निराशा व्हायची. दहावीला बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासामुळे गॅदरिंगमध्ये सादरीकरण करण्यास परवानगी नसायची. त्यामुळे नववीचं वर्ष वार्षिक स्नेहसंमेलनात सहभागी होण्याचं शेवटचं वर्ष. या वर्षी काही केल्या आम्हाला जिंकायचं होतं हे अंकुशन निश्चित केलं होतं. त्यावर्षी नानकर सरांनी ‘ब’ वर्गाचं एक नाटक बसवलं होतं. ‘चिंगीचं लग्न’ असं त्या नाटकाचं नाव होतं. त्यात अंकुशने पहिल्यांदा चिंगीच्या आईची भूमिका साकारली होती.

अगदी सहावारी साडी लांब वेणी, कपाळावर लाल टिकली आणि हातात हिरव्या बांगड्या अशा स्त्रीवेषात अंकुश अगदी हुबेहूब मुलगी असल्यासारखा नटला होता . त्यात अशीही गंमत झाली की, शाळेच्या समोर एक फोटो स्टुडिओ होता अंकुश तयार होऊन तिकडे फोटो काढायला गेलो, फोटो काढला आणि पावती बनवताना फोटोग्राफरला नाव सांगितलं, ‘अंकुश चौधरी…’. तेव्हा त्याला कळलं की अंकुश मुलगी नसून मुलगा आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यावर्षी अंकुशच्या वर्गाला पहिल्यांदा बक्षीसही मिळालं. शाळेत असतानाच केदार शिंदे सोबत ओळख झाली होती . पुढे महर्षी दयानंद कॉलेजमध्ये गेल्यावर नाट्य स्पर्धा,एकांकिका गाजवल्या याच दरम्यान केदार शिंदेने महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अंकुशला सुचवले. केदार शिंदे, भरत जाधव, अरुण कदम, संतोष पवार, दीपा परब(पत्नी) यांच्याशी पक्की मैत्री झाली आजही त्यांची ही मैत्री अशीच घट्ट टिकून आहे हे विशेष…