मोठय़ांचा अपमान करतोस, फटकळपणे बोलतोस, टोमणे मारतोस हे वागणे तुला शोभतं का? तू असा वागशील असं कधीच वाटलं नव्हतं. अभिनेता सुयश टिळकला सध्या ही बोलणी ऐकून घ्यायला लागत आहेत. यापैकी एकाही वाक्यात कौतुक नाही, तरीही या बोलण्यावर सुयश काहीच स्पष्टीकरण देत नाहीय. आता तुम्ही म्हणाल की एकतर सुयशच्या वर्तणुकीवर कुणीतरी त्याचा समाचार घेतय आणि तरीही त्याला सुयश उलटून एकाही शब्द बोलत नाहीय, इतकच नव्हे तर सुयशला आनंदच होतोय. नव्हे नव्हे, सुयशची पत्नी आयुषी त्याला ओरडतेय आणि तो गप्पपणे ऐकून घेतोय असं तुम्हाला वाटत असेल तर असं अजिबात नाहीय. आयुषीसाठी तर सुयश एकदम अस्साच नवरा हवा या फ्रेममध्ये आहे. मग सुयश असं काय वागला आहे, आणि त्यावरून त्याला असं कोण धारेवर धरतय ?

साधा सरळ जयराम, रांगडा तरीही मनाने साफ असलेला सूर्या, आईवडिलांचा आदर करणारा शंतनू, महत्वाकांक्षी बिझनेसमन क्षितिज निंबाळकर यामध्ये तू किती शहाणा मुलगा होतास. पण आता तू कपिल बनून जो काही मोठय़ांचा अपमान करतोस, फटकळपणे बोलतोस, टोमणे मारतोस हे वागणे तुला शोभतं का? तू असा वागशील असं कधीच वाटलं नव्हतं ही प्रतिक्रिया सुयशला मिळाली आहे ती त्याच्या ‘मी स्वरा आणि ते दोघे’ या नाटकातील त्याच्या कपिल या भूमिकेसाठी. या नाटकाचे प्रयोग सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळतोय. आयुष्याची सेकंड इनिंगही आपण नव्याने सुरू करू शकतो. आयुष्यात येणारी पोकळी कुरवाळत बसण्यापेक्षा जीवनात नव्या व्यक्तीला सामावून घेता आले पाहिजे या वनलाइन स्टोरीवर बेतलेल्या या नाटकात सुयशने फटकळ कपिलची व्यक्तीरेखा साकारली आहे. विजय पटवर्धन, निवेदिता सराफ, रश्मी अनपट यांच्यासोबत सुयश नाटकाच्या मंचावर पहिल्यांदाच काम करतोय. या नाटकात सुयश कपिल नावाच्या तरूणाची भूमिका करत आहे. सुयश सांगतो, माझी आजपर्यंतची प्रत्येक भूमिका गुडबॉयची होती. पण कपिल मात्र येताजाता प्रत्येकाचा अपमान करणारा, इतरांना तुच्छ लेखणारा असा आहे. टोमणे मारून समोरच्या व्यक्तीला दुखावण्यात या कपिलला मजा येते. अर्थात कलाकार म्हणून मला फटकळ कपिल साकारायला आवडलं. या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. सुयश तू असा वागशील असं कधीच वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया मला जेव्हा मिळाली तेव्हा मी करत असलेला कपिल योग्य ट्रॅकवर आहे याची मला खात्री पटली. कलाकारांना नेहमीच प्रतीक्षा असते ती त्यांनी वठवलेल्या भूमिकेला चाहत्यांकडून मिळणारया प्रतिक्रियेची.

सुयशने नाटकात रंगवलेला कपिल सध्या त्याच्या गैरवागणूकीने लोकप्रिय ठरत आहे हे मिसमॅच हीच माझ्या कामाची पावती आहे. सोशलमीडियावर सतत सक्रिय असलेल्या सुयशनेच चाहत्यांकडून आलेली ही प्रतिक्रिया शेअर केली आहे. कोरिओग्राफर आयुषी भावेसोबत गेल्यावर्षी सुयशने लग्न केले. काही दिवसांपूर्वी सुयशने आयुषीसोबतचे गोव्यातील फोटोही शेअर केले होते. पर्यावरणाशास्त्राचा पदवीधर असलेला सुयश नेहमीच त्याच्या सोशलमीडिया पेजवरून सेव्ह नेचर याविषयी उपक्रम, अनुभव शेअर करत असतो. अभिनयासोबत तो उत्तम फोटोग्राफरही आहे. का रे दुरावा या मालिकेतून त्याने नायक म्हणून करिअरची सुरूवात केली. दुर्वा, एक घर मंतरलेले, बाप माणूस, शुभमंगल ऑनलाइन या मालिकांतील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत. नुकताच त्याचा हॅश टॅग प्रेम हा सिनेमा प्रदर्शित झाला. मालिका, नाटक आणि सिनेमा या तीनही माध्यमात सुयश त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतो.