
किचन कल्लाकार हा नवीन कुकरी शो झी मराठी वाहिनीवर बुधवार ते गुरुवार रात्री ९.३० वाजता प्रसारित केला जात आहे. काल १५ डिसेंबर रोजी ह्या शोचा पहिला भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाला. प्रशांत दामले ह्या शोमध्ये परिक्षकाची भूमिका निभावत आहेत तर संकर्षण कऱ्हाडेने सुत्रसंचालनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. शोमध्ये वेगवेगळ्या मराठी कलाकारांना आमंत्रित करून त्यांच्याकडून प्रशांत दामले यांनी सांगितलेला पदार्थ बनवुन घेतले जातात. तेजस्विनी पंडित, प्रार्थना बेहरे आणि आदिनाथ कोठारे हे कलाकार पहिल्या भागात स्पर्धक बनून आले होते. त्यात प्रार्थना बेहरे ने बनवलेली पुरणपोळी इतर पदार्थांच्या तुलनेत सरस ठरली त्यामुळे प्रशांत दामले यांनी प्रार्थनाला विजेतेपद दिले.

अर्थात हे सर्व पदार्थ बनवताना कलाकारांचा मात्र गोंधळ उडाला होता त्यात प्रार्थनाने कधीही पुरणपोळी बनवली नव्हती त्यामुळे तिच्यासाठी हा टास्क खूपच कठीण होता. मात्र या शोमध्ये कलाकारांना पदार्थ बनवताना एक महिला मार्गदर्शक देण्यात आली होती त्यामुळे पदार्थ बनवताना कलाकारांना फारशी अडचण आली नाही. ह्या महिला मार्गदर्शक नक्की कोण आहेत ते जाणून घेऊयात… किचन कल्लाकार ह्या शोमध्ये एक मार्गदर्शक बनून आलेल्या महिलेचे नाव आहे “जयंती कठाळे”. जयंती कठाळे या काही वर्षांपूर्वी आयटी क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत होत्या. त्यामुळे अनेकदा त्या परदेशात देखील गेल्या होत्या. मात्र परदेशात हॉटेलमध्ये गेल्यावर महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण का मिळत नाही? असा प्रश्न त्यांना सतत भेडसावत होता. चायनीज, इटालियन, पंजाबी, साऊथचे पदार्थ मिळतात मग आपल्या महाराष्ट्रातली पुरणपोळी, वरण भात, थालीपीठ असे घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ का नाही मिळत या विचारानेच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. घरदार, मुलं सांभाळून त्यांनी आयटी क्षेत्रातला जॉब सोडला आणि बंगलोरला ‘पूर्णब्रह्म’ या नावाने स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू केला. मराठी खाद्यसंस्कृती जगभरात पसरवून त्यांनी पूर्णब्रह्मला वेगळी ओळख मिळवून दिली.

आपल्या मराठी माणसांना महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण परदेशात देखील मिळावं यासाठी त्यांनी ‘पूर्णब्रह्म’ च्या माध्यमातून मोठे प्रयत्न केले आहेत. आज देशविदेशात बऱ्याच ठिकाणी त्यांनी पूर्णब्रह्मचा विस्तार वाढवला आहे. या पूर्णब्रह्मची आणखी एक खासियत अशी की या हॉटेलमध्ये खाली गाद्यावर बसून जेवण केले जाते आणि इथे काम करणाऱ्या महिला देखील नऊवारी नेसुनच काम करताना तुम्हाला दिसतील. परदेशात कधीही शक्य नाही असे अळीवाचे लाडू देखील त्यांच्या पूर्णब्रह्ममध्ये मिळतात. जयंती ताईंनी मिळवलेलं हे यश निश्चितच त्यांना सहजासहजी मिळालेलं नाही त्यामागे चिकाटी, अपार मेहनत आणि जिद्द यांची सांगड त्यांनी घातली होती. अर्थात यात त्यांना त्यांचे पती प्रणव आणि दीर संदीप गढवाल तसेच पूर्णब्रह्म टीम यांची खंबीर साथ मिळाली होती. पूर्णब्रह्मचा यशस्वी प्रवास सांगताना त्या इतर महिलांना देखील सक्षम बनवण्यासाठी नेहमी मार्गदर्शन करताना दिसतात. असाच एक प्लॅटफॉर्म त्यांना झी वाहिनीने दिलेला आहे किचन कल्लाकारच्या माध्यमातून त्या आता पदार्थ बनवण्यासाठी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.