
गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षित असलेला मराठी बिग बॉसचा ३रा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर हा रिऍलिटी शो टेलिकास्ट केला जातो. येत्या १९ सप्टेंबर २०२१ रोजी मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन दररोज संध्याकाळी ७ वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे. या शोचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून त्याचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. महेश मांजरेकर यांना कॅन्सरचे निदान झाले होते त्यावर आता यशस्वीपणे उपचार देखील करण्यात आले आहेत. या आजारपणामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावलेली पाहायला मिळते.

असे असले तरी त्याच ताकदीने पुन्हा एकदा ते बिग बॉसची धुरा सांभाळायला सज्ज झाले आहेत याचे कौतुक आहेच… बिग बॉसच्या या तिसऱ्या सिजनमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक कलाकारांना विचारण्यात आले होते. अंशुमन विचारे, ऋषी सक्सेना, नेहा खान, किशोरी अंबिये, निशिगंधा वाड, नेहा जोशी, केतकी चितळे, रसिका सुनील, आदिती सारंगधर, संग्राम समेळ, तेजश्री प्रधान, पल्लवी सुभाष, चिन्मय उदगीरकर, अक्षया देवधर, रुपल नंद आणि समीर चौगुले या सर्व कलाकारांना मराठी बिग बॉस मध्ये सहभागी होण्यासाठी विचारले होते. मात्र नुकतेच केतकी चितळे हिने बिग बॉसच्या रिऍलिटी शोमध्ये तुर्तास तरी सहभागी होत नसल्याचे कळवले आहे. तर ऋषी सक्सेनाला देखील याबाबत विचारले असता त्याने देखील सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. तेजश्री प्रधान हिने देखील या शोमध्ये येण्यास नकार कळवळा आहे. सध्या तेजश्री मालिका आणि नाटक निर्मितीकडे वळली असल्याने ती आपल्या कामात खुप व्यस्त आहे या कारणास्तव ती या शोमध्ये सहभागी होत नसल्याचे सांगते.

तुर्तास आणखी काही कंटेस्टंट सहभागी होणार आहेत त्यांची नावे गुलदस्त्यात असली तरी लवकरच ते तुमच्यासमोर येतील पण त्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. मराठी बिग बॉसचा हा तिसरा सिजन या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रक्षेपित होणार होता मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे तो पुढे-पुढे ढकलण्यात आला. मधल्या काळात त्यात सहभागी होत असलेल्या अनेक कलाकारांची यादी देखील जाहीर केली गेली. त्यानंतर हा शो ऑगस्ट महिन्यात प्रक्षेपित होईल अशी आशा होती. त्यामुळे हा बहुप्रतिक्षित असलेला रिऍलिटी शो अखेर प्रेक्षकांसमोर लवकरच दाखल होणार असल्याचा शिक्कामोर्तब झाला असल्याने या शोचे चाहते भलतेच खुश झालेले पाहायला मिळत आहेत.