सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मधल्या काळात या मालिकेला टीआरपीच्या बाबतीत मोठी लीड मिळालेली दिसली. गौरी आणि जयदीपची जुळून आलेली केमिस्ट्री या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. वेळोवेळी गौरीची बाजू सावरणारा जयदीप तितकाच भाव खाऊन जाताना दिसतो. समंजस आणि रुबाबदार असलेला हा जयदीप सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आज जयदीपच्या रिअल लाईफबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत…

जयदीपची भूमिका साकारली आहे अभिनेता “मंदार जाधव”ने. मंदारचे वडील सुभाष जाधव हे देखील लेखक, दिग्दर्शक आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते या कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. मंदारला लहानपणी क्रिकेटर व्हायचं होत शरदाश्रम शाळेत असताना रमाकांत आचरेकर यांच्याकडे तो क्रिकेटचे धडे गिरवत होता मात्र पुढे कॉलेजला गेल्यावर एनसीसी जॉईंट केलं त्यानंतर क्रिकेटची आवड मागे पडली. यावेळी देशसेवेत रुजू व्हावं अशी मनोमन ईच्छा होती मात्र नशिबाच्या पुढे कोणाचे काहीच चालत नाही अगदी तसेच मंदारच्या बाबतीत घडले. मंदारचा धाकटा भाऊ मेघना जाधव हा लहान असल्यापासून अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकला आहे. एकदा एका ऑडिशनला मंदार त्याच्यासोबत गेला होता तेव्हा तिथे त्यालाही ऑडिशन देण्यासाठी सांगितले. आम्हाला असाच चेहरा हवा आहे म्हणून मंदारची देखील ऑडिशन घेण्यात आली. २००६ मध्ये “से सलाम इंडिया” या हिंदी चित्रपटातून त्याचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले. त्यानंतर झी टीव्ही वरच्या “अल्लादिन” मालिकेत भूमिका मिळाली. या भूमिकेने मंदारला खूप लोकप्रियता मिळाली होती.

अगदी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच त्याचे कौतुक केले होते. त्यानंतर वीर शिवाजी, बालिका वधू, महावीर हनुमान, पवित्र रिश्ता, प्यार का दर्द है मिठा मिठा अशा अनेक मालिकांमधून विविधांगी भूमिका त्याने साकारल्या. हिंदी मालिका गाजवल्यानंतर त्याने आपली पावले मराठी सृष्टीकडे वळवली. “श्री गुरुदेव दत्त” या मालिकेत दत्तात्रयाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मात्र काही कालावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत पुन्हा एकदा प्रमुख नायक साकारण्याची संधी मिळाली. आपल्या अभिनयातून त्याने साकारलेला समंजस जयदीप प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मंदारची पत्नी मितीका शर्मा जाधव ही देखील हिंदी मालिका अभिनेत्री आहे. मंदारसोबत लग्नानंतर तिने मालिका क्षेत्रात काम करणे कमी केले आहे. संतान, श्री, काव्यांजली, ख्वाहिश, एजंट राघव, देवो के दव महादेव अशा वेगवेगळ्या मालिकेतून ती प्रेक्षकांसमोर आली आहे. ह्रिदान आणि ह्रीआन या दोन मुलांच्या जन्मानंतर तिने आपले संपुर्ण लक्ष मुलांच्या संगोपणावर केंद्रीत केले आहे. मंदारच्या रूपाने एक मराठमोळा कलाकार हिंदी मालिका सृष्टीत अधिराज्य गाजवताना दिसला हे ही नसे थोडके…