स्टार प्रवाहवरील वाहिनीच्या बहुतेक सर्वच मालिका टीआरपीच्या बाबतीत अग्रेसर राहिल्या आहे. त्यात विशेष म्हणजे रंग माझा वेगळा या मालिकेने गेल्या अनेक महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. मालिकेत दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र कधी येतील अशी आशा प्रेक्षक बाळगून आहेत. त्यात दीपा व्यावसायिका बनवून स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना दिसत आहे. एवढे दिवस आपल्या सुनेचा रागराग करणारी सौंदर्यादेखील दिपाच्या बाजूने झालेली पाहायला मिळत आहे आणि दिपाला भक्कम पाठिंबा दर्शवला आहे.

मालिकेत येत्या काही दिवसात धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. रंग माझा वेगळा या मालिकेतून कार्तिकच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता आशुतोष गोखले याच्या पायाला नुकतीच एक गंभीर दुखापत झाली आहे. या दुखापतीबाबत त्याच्या चाहत्यांना समजले त्यावेळी चौकशी करणारे अनेक मेसेजेस आणि फोन कॉल्स त्याला येऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आशुतोष गोखले याने आपल्या दुखपतीबाबत खुलासा केला आहे आणि काळजी करण्यासारखे जास्त काही झाले नाही असेही त्याने म्हटले आहे. आशितोषच्या डाव्या पायाच्या गुडख्याला एक दुखापत झाली त्यात त्याच्या हाडांना मार लागला आहे. यावर उपचार घेतले असून डॉक्टरांनी त्या गुडघ्याला सपोर्टसाठी एक बेल्ट लावण्यास सांगितला आहे. जवळपास ४ आठवड्यांसाठी हा बेल्ट माझा सोबती असणार आहे असे आशुतोष म्हणतो. परंतु ही गंभीर दुखापत असली तरी मी चालू शकतो, बसू शकतो आणि पोजदेखील देऊ शकतो अशा मिश्किल अंदाजातले फोटो त्याने शेअर करून सांगितले आहे.

या दुखापतीमुळे डॉक्टरांनी पुढील चार आठवडे काळजी घेण्यास सांगितले असले तरी मी मालिकेत सक्रिय राहणार आहे असे तो आवर्जून सांगतो. मालिकेव्यतिरिक्त आशुतोष नाटकांच्या दौऱ्यामध्ये देखील व्यस्त असलेला पाहायला मिळतो. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे. या नाटकाचे दौरे सुरू आहेत त्यामुळे मी या नाटकात सुद्धा काम करणार आहे आणि माझं नाटक पाहायला तुम्हीही आवर्जून यायचं अशी अपेक्षा त्याने त्याच्या चाहत्यांकडे व्यक्त केली आहे. आज ६ फेब्रुवारी रोजी विष्णुदास भावे, वाशी येथे या नाटकाचा प्रयोग होणार आहे. काल प्रबोधनकार ठाकरे येथे प्रयोग झाला त्यावेळी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. त्यामुळे मी नाटक आणि मालिकेतून तुमच्या भेटीला येणार आहे असे तो आवर्जून सांगताना दिसतो.