स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका मुलगी झाली हो आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मधल्या काही काळात टीआरपीच्या रेसमध्ये या मालिकेने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यामुळे या मालिकेची लोकप्रियता अधिक होती. मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. येत्या २ मे पासून या मालिकेच्या जागी रात्री ९.०० वाजता ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मालिकेतील स्वराला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत असतात पण आपला बाप कोण हेच तिला माहीत नसते अशी ही स्वराची कहाणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

तुझेच मी गीत गात आहे ही हिंदी मालिका ‘कुल्फी कुमार बाजेवला’ या मालिकेचा रिमेक असल्याचे बोलले जात आहे. कुल्फी कुमार बाजेवला या मालिकेत एका गायकाला गावातील मुलीसोबत प्रेम होते तो तिच्याशी लग्न करतो मात्र तू मला किंवा गाण्याला दोन्हीपैकी एकाच गोष्ट निवडू शकतोस असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो तेव्हा तो गाण्याला निवडतो. आपल्या बायकोला सोडून तो मुंबईत निघून जातो. पण इकडे त्याची पत्नी गरोधर असते हे तिला माहीतच नसते. मुलीच्या जन्मानंतर आईचा मृत्यू होतो पण ही मुलगी आपल्या गोड गळ्याने सगळ्यांची मने जिंकून घेते. परंतु आपला बाप कोण हा प्रश्न तिच्यासाठी अनुत्तरीतच राहतो. याच प्रश्नांची उत्तरं शोधणारी ही स्वरा २ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोड गळ्याची स्वरा पुढे संघर्ष करत मोठी होऊन गायन क्षेत्रात नाव कमावते. हे या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अशा आगळ्या वेगळ्या कथेची उत्सुकता मालिकेच्या प्रोमोमधूनच अधिक वाढलेली पाहायला मिळत आहे. हीच मालिका बंगाली भाषेत देखील लोकप्रिय झाली होती. ‘पोटोल कुमार गानवाला’ असे या बंगाली भाषिक मालिकेचे नाव होते.

मालिकेतील कलाकारांची नावे वाहिनीने अजून गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले आहे. मात्र या कलाकारांच्या नावबाबत लवकरच उलगडा केला जाईल. मुलगी झाली हो ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेणारी ठरली होती. मुलगी झाली म्हणून बापाने तिला झिडकारले होते तिच्या संघर्षाची कहाणी या मालिकेने सुरेख साकारली होती. या मालिकेने दिव्या पुगावकर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. माऊ म्हणजेच साजिरी कधी बोलायला लागेल याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष्य लागून होते मात्र आता मालिका निरोप घेत असल्याने तो क्षण मालिकेतून लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेचा शेवट असाच गोड होणार असल्याने काही प्रेक्षकांनी या मालिकेच्या आटोपते घेण्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मालिका अधिक वाढवत राहण्यापेक्षा ती आटोपतो घेऊन शेवट गोड करावा अशीच अपेक्षा प्रेक्षकांची असते. त्यामुळे ह्या निर्णयाचे स्वागतच केलेले पाहायला मिळत आहे.