गेल्या अठरा वर्षांपासून झी मराठी वाहिनीने होमिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तमाम वहीनींना पैठणी देऊन सन्मानित केले आहे. आता होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे महामिनिस्टर अशा मोठ्या स्वरूपात बदल केलेला पाहायला मिळतो आहे. महामिनिस्टरच्या या नव्या शो मध्ये वहिनींना आदेश भाऊजी तब्बल ११ लाखांची पैठणी देऊन हा सन्मान अधिक उंचावताना पहायला मिळणार आहेत. ही ११ लाखांची पैठणी असे कारागीर विनणार आहेत ज्यांना ऐकू येत नाही आणि बोलताही येत नाही. या हातांना काम मिळावे, त्यांच्या संसाराचा गाडा सुरळीत चालावा हाच यामागचा मुख्य उद्देश आहे असे आदेश बांदेकर यांनी बोलून दाखवले होते.

त्यामुळे ही अकरा लाखांची पैठणी कशी असणार आणि ती कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आदेश बांदेकर यांनी आणखी एक मत जाहीरपणे व्यक्त केलेले पाहायला मिळत आहे. होमिनिस्टरचा कार्यक्रम नेहमी मोठमोठ्या शहरात जाऊन केला जातो. शहरातील वहिनींनाच पैठणी दिली जाते असे आरोप या कार्यक्रमाबाबत लावले जात होते. ही तमाम खेड्यातील, गावातील महिलांची मागणी होती की आदेश बांदेकर आमच्याही गावात यावेत आणि त्यांनी हा कार्यक्रम करून आम्हाला पैठणी द्यायला हवी. परंतु आता हीच मागणी आदेश बांदेकर लवकरच पूर्ण करताना दिसणार आहेत. साधारण दोन दिवसांपूर्वीच महामिनिस्टरच्या कार्यक्रमात आदेश बांदेकर यांनी हे जाहीर केले आहे. या कार्यक्रमात एका वहिनीने आदेश बांदेकर यांना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही हा कार्यक्रम घेऊन खोडेपोडी का जात नाहीत ? ‘मी सुद्धा खेडेगावातून आली आहे, माझी आई खेड्यात राहते तिला शेतातील कामामुळे तुमचा कार्यक्रम बघता येत नाही पण तिला हा कार्यक्रम खूप आवडतो तुम्ही असा कार्यक्रम खेडोपाडी करावा अशी माझी ईच्छा आहे. मी लग्न होऊन शहरात आले त्यामुळे मला या कार्यक्रमात सहभागी होता आले.

‘ वहिनीच्या या प्रश्नावर आदेश बांदेकर लगेच उत्तरले आणि म्हणाले की, ‘ आता शहरं बास झाली. महामिनिस्टरचा कार्यक्रम संपला की मीच स्वतः या गोष्टीला प्राधान्य देणार आहे. अनेकदा याबाबत बोलले जात होते त्यावर विचार करण्यात येऊ लागले. महाराष्ट्रातील खेडोपाडी जाऊन अगदी शेताच्या बांधावर जाऊन आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत.’ असे आश्वासन आदेश बांदेकर यांनी महामिनिस्टरच्या मंचावर दिलेले पाहायला मिळाले. त्यामुळे आता ज्या ज्या महिलांनी ही मागणी केली होती त्या महिलांना या कार्यक्रमात सहभागी होऊन लवकरच पैठणीचा मान मिळवण्याची संधी मिळणार आहे. ११ लाखांच्या पैठणीचा सोहळा पार पडल्यानंतर होमिनिस्टर कार्यक्रमात हा बदल घडून आलेला पाहायला मिळणार आहे त्यामुळे येत्या काळात आदेश भाऊजी कोणकोणत्या गावांना भेटी देणार आणि वहिनींना बोलतं करणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.