
सोनी मराठीवरील “अजूनही बरसात आहे ” या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेचे मुख्य पात्र मीरा आणि आदिराज यांची कहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे.या मालिकेच्या निमित्ताने तब्बल आठ वर्षानंतर मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची जोडी छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांसमोर आली आहे. मालिकेतल्या सर्वच जाणत्या कलाकारांनीही त्यांना चांगली साथ दिलेली पाहायला मिळते. आज मिराची बहीण मनस्विनी हिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

मालिकेत मनू अर्थात मनस्विनीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “पूर्वा कौशिक” हिने. पूर्वा कौशिक मूळची अंबरनाथची मात्र सध्या ती ठाण्यात वास्तव्यास आहे. भगिनी मंडळ हायस्कुल आणि एस एम टी कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका स्पर्धा मध्ये तिने सहभाग दर्शवला होता. ‘कानाची घडी तोंडावर बोट’ या नाटकातून प्रसाद खांडेकर सोबत काम करता आले. पुढे ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन शोध नव्या विनोदवीरांचा ‘ मध्ये तिने सहभाग घेऊन प्रेक्षकांना हसवले. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या लोकप्रिय मालिकेतूनही तिने महत्वाची भूमिका साकारली होती. “डोन्ट वरी हो जयेगा” या नाटकात अभिनेते संजय खापरे यांच्यासोबत मुख्य नायिकेची भूमिका तिने बजावली होती. त्यामुळे पूर्वा कौशिक हळूहळू मालिका क्षेत्रात आपला जम बसवताना दिसू लागली आहे. अजूनही बरसात आहे या मालिकेत पूर्वाला मनूची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. खरं तर मालिकेतून मिराचे कुटुंब खूपच सुंदर दर्शवले आहे. त्यामुळे यातील सर्वच पात्र प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहेत.

आता मनू मल्हारमुळे प्रेग्नन्ट असल्याचे कळल्यावर आदिराजचे कुटुंब आणि मिराचे कुटुंब काय निर्णय घेतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे या कारणामुळे मीरा आणि आदिराज देखील पुन्हा एकत्र येणार का याची उत्सुकता आहेच. अभिनेत्री पूर्वा कौशिक ही अमोघ फडके यांच्याशी विवाहबद्ध झाली. अमोघ फडके हा देखील रंगभूमीवरचा कलाकार असून बॅकस्टेजला राहून नाटकांच्या प्रकाशयोजनाची जबाबदारी पार पाडत आहे. चतुरंग प्रतिष्ठान आयोजित सवाई एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना म्हणून अमोघला पुरस्कार देण्यात आला होता. सिंड्रेला या नाटकासाठीही त्याला झी गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. सर प्रेमाचं काय करायचं या व्यावसायिक नाटकासाठीही त्याला पारितोषिक देण्यात आले. पूर्वा आणि अमोघ दोघांचेही कला क्षेत्राशी घट्ट नाते जुळले आहे. “अजूनही बरसात आहे” मालिकेतील सर्वच कलाकारांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…