सशक्त कथानक आणि तगडे कलाकार यावर मालिकेचे यश अवलंबून असते असे म्हटले जाते. परंतु असे असले तरी सध्याच्या घडीला आता प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील तितकाच महत्वाचा मानला जातो. जर मालिकेला प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद मिळालाच नाही तर तिथे ह्या दोन्ही गोष्टी गौण मानल्या जातात. असेच काहीसे आता टीव्ही मालिकांच्या बाबतीत घडलेले पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एका सरस एक मालिकांप्रमाणेच आता हळूहळू नवनवीन वाहिन्या देखील दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढू लागल्या आहेत. प्रेक्षकांच्या मनावर एवढे वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या झी मराठी वाहिनीला देखील ही स्पर्धा चुकलेली नाही.

अशातच स्टार प्रवाह वाहिनी सर्व वाहिन्यांमध्ये सरस ठरलेली पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सोनी मराठी वाहिनीने अजूनही बरसात आहे ही मालिका सुरू करून तगडे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आणले. उमेश कामत आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार म्हणून प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली होती. १२ जुलै २०२१ रोजी अजूनही बरसात आहे या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला. वयाच्या चाळीशीत पुन्हा एकदा भेट घडून आलेले आदिराज आणि मीरा यांची ही हटके प्रेम कहाणी मालिकेतून दर्शवण्यात आली. दोघांची नोकझोक पुढे लग्न करण्यापर्यंत येऊन पोहोचली आणि आता आदिराजच्या कुटुंबात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मिराचा संघर्ष सुरू झालेला पाहायला मिळाला. अनेक अडचणींवर मात करत मीरा आणि आदिराज दोघेही विस्कटलेले कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि यात त्यांना यश देखील मिळत आहे. कथानक चांगले असले तरी मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेला प्रेक्षकांकडून अल्पसा प्रतिसाद मिळू लागला आहे.

त्यामुळे ही मालिका आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. अवघ्या ७ महिन्यांच्या कालावधीतच तगडे कलाकार असूनही या मालिकेला आता आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. अर्थात कथानकाला अधिक फाटे न देता मालिका योग्य त्या वेळी संपवल्याने प्रेक्षकांनी या मालिकेचे कौतुकच केले आहे. नुकतेच मालिकेच्या अखेरच्या दिवसाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यावेळी सेटवर मालिकेतील कलाकार खूपच भावुक झालेले पाहायला मिळाले. लवकरच पुन्हा भेटू असे म्हणत या कलाकारांनी एकमेकांना निरोप दिलेला पाहायला मिळतो. येत्या १४ मार्चपासून या मालिकेच्या जागी रात्री ८ वाजता ‘ असे हे सुंदर आमचे घर’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या मालिकेतून संचिता कुलकर्णी, सुकन्या मोने, संयोगीता बर्वे हे कलाकार झळकणार आहेत. सासू सुनेच्या प्रेमळ नात्यावर भाष्य करणारी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल.