सोनालीच्या कांदे पोह्याचा हा धमाल किस्सा नुकताच बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना ऐकायला मिळाला

बिग बॉसच्या घरात एक स्ट्रॉंग कंटेस्टंट म्हणून सोनाली पाटील हिच्याकडे पाहिले जाते. जे आहे ते तोंडावर बोलणारी , जशी आहे तशीच वागणारी सोनाली याच कारणामुळे प्रेक्षकांना देखील खूपच आवडू लागली आहे. कोल्हापूरच्या छोट्याशा गावातून आलेल्या सोनालीने कला क्षेत्रात चांगला जम बसवलेला पाहायला मिळतो. वैजू नं 1, देवमाणूस, घाडगे अँड सून अशा मालिकेतून सोनाली पाटील महत्वाच्या भूमिका साकारताना दिसली. या धावपळीत लग्नासाठी एक स्थळ तिला पाहायला आले होते.

कांदे पोह्याच्या ह्या कार्यक्रमाचा धमाल किस्सा नुकताच तिने मीनल, तृप्ती, विकास आणि विशालसोबत शेअर केला. त्यावेळी तिने लग्नाचा केला नव्हता मात्र पाहायला आलेल्या पाहुण्यांनी तिची ओटी भरली. त्यात एक भला मोठा नारळ, गहू, तांदूळ, साडीचा पीस आणि डझनभर केळी असल्याने तिची ओटी आणखीनच जड झाली. त्यात आणखी एक मजेची बाब म्हणजे ही भरलेली ओटी धरून पाहुण्यामंडळींच्या पाया पडण्यासाठी तिला सांगितले तर ओटीतील सर्व वस्तू खाली पडल्या. तिथे असलेल्या एकेकानी वस्तू गोळा करून दिल्यावर पुन्हा एकदा पाया पडण्यासाठी सांगितले. पुन्हा सर्वांच्या पाया पडून झाल्यावर मुलाला काही विचारायचा का? असा प्रश्न केला तेव्हा सोनालीने मला काहीच विचारायचं नाही असे सांगितले. हा कार्यक्रम आटोपल्यावर सोनालीला पुन्हा एकदा सर्वांच्या पाया पडण्यासाठी सांगितले. एवढ्या वेळा पाया पडताना वैतागलेली सोनाली अक्षरशः हात जोडून नमस्ते म्हणून तिच्या खोलीत निघून गेली. तिच्या पाठोपाठ सोनालीची आई देखील त्या खोलीत गेली आणि रागाने तिचा गाल ओढून तू तिथं बातम्या द्यायला गेलेलीस का?…नमस्ते म्हणून आलीस…असे म्हणत तिच्या आईने लेकीचा समाचार घेतला.