कुणीतरी येणार असं म्हणत बऱ्याच मराठी अभिनेत्रींनी आपल्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत. मात्र आता मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी जुळ्या मुलांचे आगमन झाले आहे. हा अभिनेता आहे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण कऱ्हाडे दोन मुलांचा बाप झाल्याने त्याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. २७ जुन २०२१ रोजी संकर्षणची पत्नी शलाका हिने जुळ्या मुलांना जन्म दिला. आज त्यांचे संकर्षणच्या घरी आगमन झाले. आपल्या जुळ्या मुलांची नावे त्याने अर्थसाहित सांगितली आहे.

चि. सर्वज्ञ (SARVADNYA) संकर्षण कऱ्हाडे . कु. स्रग्वी (SRAGVI) संकर्षण कऱ्हाडे (सर्वज्ञ – सर्व जाणनारा , ज्ञानी. स्रग्वी – पवित्रं तुळस) अशी त्याच्या दोन्ही मुलांची नावे आहेत. परभणीचं नाव मनोरंजन विश्वात गाजवणारा अभिनेता म्हणजे “संकर्षण कऱ्हाडे “. मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. 2008 साली झी मराठीवरील “महाराष्ट्राचा सुपरस्टार” शोमधून तो प्रेक्षकांसमोर आला होता. ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’ आणि ‘आभास हा’ या मालिकांमध्ये संकर्षणने अभिनय साकारला आहे. झी मराठीवरील ‘रामराम महाराष्ट्र’चे सूत्रसंचालनही त्याने केलं. यासोबतच ‘लोभ असावा’, ‘मी रेवती देशपांडे’, ‘तू म्हणशील तसं’ हे व्यावसायिक नाटक त्याने साकारले. संकर्षण त्याच्या उत्तम अभिनयासोबतच सर्वात जास्त चर्चेत असतो ते त्याच्या जबरदस्त कवितांमुळे. त्यानं लिहिलेल्या कविता त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नेहमीच विचार करायला भाग पाडणाऱ्या असतात अशी चर्चा नेहमीच रंगते. लोकडाऊन दरम्यान त्याने केलेल्या कविता सोशल मीडियावर खूपच गाजल्या होत्या. एक हजरजबाबी अभिनेता अशीही त्याची ओळख आहे विदर्भस्टाईलने कुठल्या क्षणी तो कोणाची फिरकी घेईल याचीच चिंता त्याच्या सहकलाकाराना नेहमी वाटत असते. दिलखुलास व्यक्तिमत्व असल्याने संकर्षण प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. आज त्याने सोशल मीडियावरून आपण बाप झालो असल्याचे चाहत्यांना कळवले आहे तेही एक नव्हे दोन. अल्पावधीतच त्याच्या या बातमीवर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतो आहे. संकर्षण कऱ्हाडे आणि पत्नी शलाका यांना आई बाप झाल्याबद्दल अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा…