आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धने अरुंधतीवर तिच्या चारित्र्यावरून संशय घेतलेला असतो. हा आरोप सहन न झाल्याने अरुंधतीने देशमुखांचे घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. लवकरच अरुंधती नवीन घराच्या शोधत आहे आणि ती त्या घरात राहायला देखील जाणार आहे. आशुतोष आणि अरुंधतीने आता नव्या आयुष्याची सुरुवात करावी असा सल्ला सुलेखाताईंनी दिला आहे. त्यावर हे दोघेही काय निर्णय घेतात हे पुढील भागात पाहायला मिळेल. एकीकडे अरुंधती स्वतःच्या पायावर उभी राहू पाहत असतानाच संजनाचे खरे रूप कांचनला समजणार आहे.

अरुंधती घर सोडून गेली आता संजनाला सुनेचा दर्जा द्यायला हवा ,तरच ती आपलं सर्व काही करेन असे कांचन आप्पाना म्हणत असते. पण कांचनच्या या बोलण्यावर संजना मात्र वेगळाच विचार करत असते. मी ह्या घर संसाराच्या भानगडीत अडकणार नाही माझा उद्देश साध्य झाला की सगळं घेऊन मी यातून बाहेर पडणार आहे असा विचार संजना करत असते. अरुंधतीने काही दिवसांपूर्वी तिच्या नावावर असलेली घराची कागदपत्रे सही करून कांचनकडे सुपूर्त केली आहेत. त्यामुळे अरुंधतीने देशमुखांच्या घरावरचा हक्क सोडला आहे. या खुशीत कांचन घरातील सर्व भांड्यांवर स्वतःचे नाव लिहावे म्हणून विमलला सुचवत असते. त्यावर आप्पा कांचनवर चिडून तू माझं नाव लावायचं नाहीस असं ठणकावून सांगताना दिसतात. मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये संजनाचे खरे रूप उलगडताना दिसणार आहे. कांचन संजनाला कामं सांगत असल्याने संजना चिडून कंचनला म्हातारे मी अरुंधती नाही असे ठणकावून सांगताना दिसते. घराच्या कागदपत्रांवर संजना फेरफार करून त्या जागी मोठे टॉवर उभे करणार असल्याचे सत्य हळूहळू आता कांचनला समजणार आहे. त्यानंतर आपण संजना आणि अनिरुद्धवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे हे कांचनच्या लक्षात येणार आहे.

संजना उलटसुलट उत्तरं देत असल्याने आणि आपली कुठलीच कामे ऐकत नसल्याने कांचनला आता अरुंधतीची आठवण होत आहे. अरुंधतीला आपण किती छळलं त्याचा पश्चाताप कांचनला होणार आहे. मालिकेतील पुढच्या काही भागांमध्ये कांचनला कळून चुकणार आहे की आपण संजनावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे. मालिकेत होत असलेले हे आवश्यक बदल प्रेक्षकांना हवेहवेसे वाटणारे आहेत. त्यामुळे मालिकेच्या टीआरपी रेसमध्येही कमालीचा बदल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरलेला टीआरपी आता या घटनांमुळे सावरण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच ह्या आठवड्यात आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे.