सध्या मराठी पडद्यावर ऐतिहासिक सिनेमांची जोरदार चलती आहे. शिवाजी महाराजांचा काळ, त्यांच्या शौर्यगाथा, त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील शूरवीर, मावळे, गडकोटांची महती या विषयांना सिनेमाच्या माध्यमातून मांडत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात ऐतिहासिक सिनेमे बाजी मारत आहेत. याच पंक्तीत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात ८ कोटी ७१ लाखांचा गल्ला जमवत बॉक्सऑफीसवरही इतिहास रचला आहे. प्रवीण तरडे यांनी रंगवलेल्या सरसेनापती हंबीरराव या व्यक्तीरेखेला सिनेरसिकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असल्याची ही पावती आहे. त्यामुळे सध्या हंबीरराव सिनेमाची टीम आनंदात आहे.

पावनखिंड, फर्जंद, शेर शिवराज, फत्ते शिकस्त या ऐतिहासिक सिनेमांनी गेल्या दोन वर्षात मराठी सिनेविश्वात चांगलच राज्य केलं. राजकीय, समाजिक विषयांच्या गर्दीत आणि प्रेमकथांच्या भावविश्वात लहानांपासून मोठ्यापर्यंत लक्ष वेधून घेणाऱ्या ऐतिहासिकपटांनी पुन्हा एकदा शिवकाळ उभा केला. भालजी पेंढारकर यांनी मराठीमध्ये सुरू केलेल्या ऐतिहासिक सिनेमांची परंपरा आजच्या दिग्दर्शकांकडूनही तितक्याच ताकदीने जपली जात आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमाच्या घोषणेपासून ही कलाकृती चर्चेत आली होती. दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांनी त्यांची कमाल अनेक गाजलेल्या सिनेमांमधून दाखवली आहेच. आता प्रवीण तरडे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते या भूमिकेचं शिवधनुष्यही लिलया पेललं आहे. एक तर इतिहासातील हंबीरराव यांचे योगदान, स्वराज्यातील धाकले धनी म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजीराजे यांच्या पाठीशी ढालीसारखे उभे राहणारे सरसेनापती हंबीरराव यांच्या शौर्याची ही कथा आहे. इतिहासातील हंबीरावांच्या शौर्याचं हे पान रसिकांच्या पसंतीस उतरलं आहे. २७ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. आजवरच्या मराठीतील ऐतिहासिक सिनेमांमध्ये बिगबजेट असलेला सिनेमा असा दावा निर्मात्यांनी केला आहे.

रोखठोक संवाद आणि खचाखच भरलेल्या अॅक्शन्सची पर्वणी यामुळे या सिनेमाने प्रदर्शनाआधीच प्रमोशनमध्ये भरारी घेतली आहे. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसाताच ८. ७१ कोटी रूपयांची कमाई सरसेनापती हंबीरराव मोहिते सिनेमाने केली आहे. मराठी सिनेमाला बळकटी येण्यासाठी ही कमाई नक्कीच प्रोत्साहन देणारी आहे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. अभिनेते प्रवीण तरडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर सिनेमाच्या पहिल्या तीन दिवसातील कमाईचा आकडा शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे, पहिल्या तीन दिवसात सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमाने रचला इतिहास, हे सर्व तुमच्या प्रेमामुळेच शक्य होत आहे, असाच लोभ राहू दया. प्रवीण तरडे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते या व्यक्तीरेखेला पुरेपूर न्याय दिला आहे. पण सुरूवातीला प्रवीण तरडे ही भूमिका करणारच नव्हते, ते फक्त पडद्यामागेच या सिनेमाचा एक भाग असणार होते, पण या भूमिकेसाठी भरपूर वेळ देणारा कलाकार मिळाला नाही तेव्हा निर्मात्यांकडून प्रवीण तरडे यांनाच या भूमिकेची ऑफर देण्यात आली. त्यानंतर जे काही झालं ते सध्या पडदयावर साकारलं आहे. हा किस्साही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.