नावात काय आहे हे शेक्सपियरच्या लेखणीतून उतरलेलं वाक्य आपण अनेकदा ऐकतो. नाव हे असं एखाद्या व्यक्तीची ओळख असते तसंच एखाद्या सिनेमाचीही ओळख असू शकते. म्हणूनच सिनेमाचे नाव ठरवण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते. काही वेळा निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या किंवा पटकथा लेखकाच्या मनातलं नाव उपलब्ध असतच असं नाही, तेव्हा सिनेमाच्या नावासाठी काही पर्यायी ठेवावे लागतात. पण तरीही माझ्या सिनेमाला तेच नाव हवं होतं अशी इच्छा सिनेमा बनवणाऱ्याच्या मनात राहून गेलेली असते. पण अचानक जेव्हा ती इच्छा पूर्ण होते तेव्हा सिनेमा बनवल्याच्या आनंदापेक्षा जे आपल्याला हवं होतं ते नाव आपल्याला सिनेमासाठी मिळालं याचा आनंदही खूप मोठा असतो.

अशाच आनंदोत्सवात पावनखिंड या सिनेमाची टीम अगदी मनमुराद न्हाऊन गेलेली आहे. खरंतर या सिनेमाचं नाव पावनखिंड हेच ठरवून टीम कामाला लागली होती. लॉकडाउनपूर्वी या सिनेमाच्या निर्मितीला सुरुवात झाली आणि लॉकडाउननंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने सिनेमा रिलीज करण्यासाठी सगळे जण सज्ज झाले. हा सिनेमा बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यावर आधारित असल्यामुळे पावनखिंड यापेक्षा सिनेमाला दुसरं नाव शोभलं नसतं. पण हा सिनेमा निर्मिती प्रक्रियेत असताना काही कारणाने या सिनेमाला पावनखिंड हे नाव उपलब्ध झालं नाही. त्यामुळे जंगजोहर हे नवं नाव घेऊन सिनेमा रिलीज करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र या सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रयत्न कमी पडू दिले नाहीत आणि अखेर पावनखिंड हे नाव सिनेमाला उपलब्ध होऊ शकतं हे समजल्याबरोबर लगेच या सिनेमाचं जंगजोहर हे नाव बदलून पावनखिंड करण्यात आलं. आता हा सिनेमा पावनखिंड याच नावाने पडद्यावर आला आहे. या निमित्ताने सध्या ही टीम खूप खुशीत आहे.

बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कशाप्रकारे जीवाची बाजी लावली आणि शिवरायांच्या स्वराज्य मोहिमेत प्राणांची आहुती दिली त्याची ही कथा आहे. या निमित्ताने बोलताना अभिनेता लेखक चिन्मय सांगतो, जेव्हा ही कथा डोक्यात आली तेव्हापासूनच या सिनेमाला पावनखिंड हेच नाव असलं पाहिजे हे आमच्या सगळ्यांच्याच मनात होतं. अखेर सिनेमाच्या निर्मिती टीमने प्रचंड प्रयत्न करून सिनेमाच्या पावनखिंड या नावासाठी खूप पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हेच नाव उपलब्ध झालं एखाद्या सिनेमाच्या नामांतराची सुद्धा अशी काही कथा असू शकते हे यानिमित्ताने अधोरेखित झालं. सिनेमाला जे नाव हवं होतं ते नाव मिळाल्याचा वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर आहे. इतकेच नव्हे तर या सिनेमाच्या संपूर्ण टीमने एकत्र येत जंगजोहर या नावाला बाय-बाय करत पावनखिंड या नावाचं स्वागत केलं.