सध्याच्या घडीला मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले असल्याचे दिसून येते. गेल्या काही महिन्यांपासून मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आपल्या खात्यात कोटींचा गल्ला जमवण्यात यशस्वी ठरले आहेत. एवढेच नाही तर काही चित्रपटांनी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी जमवलेली पाहायला मिळाली आहे. मात्र असे असले तरी मराठी चित्रपटांना स्वतःचे अस्तित्व टीकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी संघर्ष करावा लागला आहे. जिथे बॉलिवूड सारखे बिग बजेट असणारे चित्रपट साउथच्या चित्रपटांसमोर पार फिके पडले आहेत त्या स्पर्धेत आपले नावीन्य टिकवून ठेवण्यासाठी मराठी सृष्टीला देखील दाक्षिणात्य सृष्टीसारखा आणखी एक तगडा प्रतिस्पर्धी मिळाला आहे. याच कारणामुळे मराठी कलाकारांनी सावध राहण्याचा पवित्रा घेतला आहे.

पांडू चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी ही खंत व्यक्त केली आहे. पुष्पा चित्रपटाचा एक डायलॉग खूपच लोकप्रिय झाला पण हा फायर करणारा पुष्पाच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपट मराठी चित्रपटांना फायरच करून टाकणारे ठरले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमूळे अगोदरच मराठी चित्रपट झळ सोसत होती. ज्या प्रेक्षकांना मराठी भाषा येते त्या प्रेक्षकांना हिंदी भाषा सहज अवगत होते मग १५० रुपयात जर तुम्हाला बॉलिवूडचा कोणता मोठा कलाकार पाहायला मिळत असेल त्या ठिकाणी तुम्ही मराठी कलाकारांना का पहायला जाणार? मराठी शाळा हळूहळू बंद पडू लागल्या आहेत त्यामुळे शहरातील भागांमध्ये हिंदी भाषेतच जास्त संभाषण केले जाऊ लागले आहे. त्याचाच परिणाम मराठी चित्रपटांवर होऊ लागला आहे. एका खास करणासाठी मी आदिवासी भागात गेलो होतो तिथे गेल्यावर मी त्या मुलांना कोणते हिरो आवडतात असा प्रश्न केला मात्र बहुतेक मुलांनी अल्लू अर्जुन, विजय देवरकोंडा अशी दाक्षिणात्य कलाकारांची नावे घेतली. त्यामुळे या दाक्षिणात्य चित्रपटांनी कुठपर्यंत मजल मारली याची जाणीव झाली. दाक्षिणात्य चित्रपटाने दर्दी प्रेक्षकवर्ग मिळवला आहे त्यामुळेच हे चित्रपट यशस्वी ठरले आहेत मराठी चित्रपटासाठी हे १०० टक्के अशक्य आहे. सैराट वेगळता मराठी चित्रपटाला ५० कोटी पर्यंत मजल मारणे अशक्य आहे.

मराठी चित्रपटांसाठी ही मोठ्या चिंतेची बाब आहे. आपलेच नाही तर हिंदी सृष्टीने देखील मान्य केलं आहे की दाक्षिणात्य चित्रपट सरस ठरलेले आहेत. मराठी चित्रपटासाठी ही धोक्याची घंटा आहे. एकीकडे चित्रपट गृह मालक देखील बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांसाठी स्क्रीन राखून ठेवत आहेत. मग सकाळच्या आणि रात्रीच्या शो साठी मराठी चित्रपटांना संधी दिली जाते मात्र या वेळेत प्रेक्षकवर्ग प्रोत्साहन देत नसल्याचे कारणं सांगत हा मालक मराठी चित्रपट काढून टाकतो. आता तर एक मोठी वाहिनी जी दाक्षिणात्य चित्रपट मराठीमध्ये डब करून छोट्या वाहिनीवर दाखवत आहेत त्यामुळे मराठी चित्रपट देशोधडीला लावणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. ढीगभर मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर दाखल होतात मात्र त्यातील चिमूटभरतरी चित्रपट चालावेत अशी अपेक्षा आहे. मराठी चित्रपटकर्त्यांनी या सर्व गोष्टींचा विचारपूर्वक अभ्यास केला पाहिजे. भविष्यात आपल्या चित्रपटांना टीकवून ठेवायचे असेल तर योग्य ती आखणी केली जावी.