मराठी सृष्टीतील उत्कृष्ट दिग्दर्शक, स्क्रीनप्ले रायटर अशी ओळख असलेले रवी जाधव यांना मातृशोक झाला आहे. २७ मे २०२२ रोजी रवी जाधव यांच्या आईचे दुःखद निधन झाले आहे. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे मराठी सृष्टीतील कलाकारांनी शोकाकुल वातावरणात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गेल्याच वर्षी म्हणजे ९ जानेवारी २०२१ रोजी रवी जाधव यांचे वडील श्री हरिश्चंद्र जाधव यांचे डोंबिवली येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले होते. वडिलांच्या पाठोपाठ आता आईच्या निधनाने त्यांचे मातृछत्रदेखील हरवले आहे. रवी जाधव यांनी मराठी चित्रपट सृष्टीत येऊन वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवले आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.एक प्रयोगशील दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख आहे.

जे जे इन्स्टिट्यूट मधून शिक्षण घेतलेल्या रवी जाधव यांनी सुरुवातीला जाहिरात क्षेत्रात सहदिग्दर्शक तसेच कॉपीरायटर म्हणून काम केले. नटरंग चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून मराठी सृष्टीत पाऊल टाकले. बालगंधर्व, रेगे, कॉफी आणि बरंच काही, न्यूड, कच्चा लिंबू, रंपाट अशा चित्रपटातून त्यांनी मराठी सृष्टीत वेगवेगळे प्रयोग केले. टाईमपास चित्रपटाच्या भरघोस यशामुळे रवी जाधव यांनी टाईमपास२, टाईमपास ३ अशी एक चित्रपटांची मालिकाच तयार केली. अनन्या, टाईमपास ३, बाल शिवाजी हे त्यांचे आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. आपल्या या यशाच्या प्रवासात आई वाडीलांसोबतच पत्नीचीही त्यांना भक्कम साथ मिळाली. त्यांचे वडील हरिश्चंद्र जाधव हे हसतं खेळतं व्यक्तिमत्त्व होतं. आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो असे ते नेहमी म्हणत. महेंद्र, वैशाली, राजेंद्र आणि रवींद्र ही चार भावंडे त्यात रवी जाधव (रविंद्र) हे सर्वात धाकटे त्यामुळे आई वडिलांसोबतच भावंडांमध्ये ते सर्वांचे लाडके होत. त्यांच्या आईच्या निधनाने जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.