सोशलमीडियाच्या प्रत्येक प्लॅटफार्मवर सेलिब्रिटी कलाकारांची हजेरी असते. नवी मालिका असो, सिनेमा असो किंवा नाटक, वेबसिरीज असो, त्यातला पहिला लूक शेअर करण्यासाठी कलाकारांना सोशलमीडिया हेच पॉवरफूल माध्यम वाटते. लाखो फॉलोअर्सना हे कलाकार त्यांच्या अगदी घरातल्या गोष्टीही सांगत असतात. सध्या रिल्सचा जमाना असल्याने नवनव्या ट्रेंडसवर सेलिब्रिटी कलाकारांचे रिल्सही धुमाकूळ घालत असतात. थोडक्यात काय चाहत्यांच्या नजरेसमोर सतत राहण्यासाठी कलाकारांना सोशलमीडिया पेजला नमस्कार करावाच लागतो. पण याच सोशलमीडियाला बिनडोकांचे माध्यम असं म्हणत निर्माते दिग्दर्शक नागराज मंजुळे चांगलेच भडकले आहेत. अर्थात नागराज यांनी सोशलमीडियावर राग काढण्याचे कारण त्यांचा सध्या चर्चेत असलेला झुंड हा सिनेमा आहे. या सिनेमावर आलेल्या प्रतिक्रियांवरून नागराज यांनी सोशलमीडियाचा चांगलाच फुटबॉल केला आहे. सध्या झुंड सिनेमाबरोबरीने नागराज यांनी एका वाहिनीच्या मुलाखतीत सोशलमीडियाला दिलेली चपराकही चांगलीच गाजतेय.

झोपडपटटी फुटबॉल या जागतिक संकल्पनेचे जनक प्रा. विजय बारसे यांच्या आयुष्यातील खरी कथा झुंड या सिनेमातून नागराज मंजुळे यांनी पडदयावर आणली आहे. गुन्हेगारीच्या मार्गाला लागलेल्या झोपडपटटीतील मुलांच्या कौशल्यांना, गुणांना हेरून त्यांची फुटबॉल टीम कशी होते आणि त्यातून समाजातील प्रस्थापितांच्या वर्चस्वावर आणि व्यवस्थेचा बळी ठरणारया वंचितांच्या जगण्याकडे लक्ष् वेधले आहे. यासाठी नागराज यांनी नेहमीप्रमाणेच कधीही कॅमेरासमोर न आलेल्या सामान्य मुलांनाच कलाकार म्हणून निवडले. पण विजय बारसे यांच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना निवडले. यावरूनच पहिली टिका झाली. एकीकडे व्यवस्थेवर ताशेरे ओढणारया सिनेमातील मुख्य भुमिकेसाठी प्रस्थापित नायक का घेतला असा प्रश्न काही नेटकरयांनी मांडला. तर फँड्री असो, पिस्तुल्या असो किंवा सैराट असो, नेहमीच वंचितांवरचेच सिनेमे का बनवला असे म्हणूनही भंडावून सोडले. झुंड सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच नागराज यांना अशा त्रासदायक प्रतिक्रिया येत होत्या. काही दिवस नागराज शांत बसले पण आज मात्र त्यांच्या संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी विचार न करता, एखादा विषय समजून न घेता सोशलमीडियावर अक्कल पाजळू नये असं म्हणत नागराजनी समाचार घेतला. नागराजच्या झुंडच्या बाबतीत चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत तशाच वाईटही येत आहेत. कुणी म्हणतय एवढा डंका पिटला,बॉक्सऑफिसवर कुठे काय कमाल दाखवलीय?’. तर कुणी नागराज नेहमी वंचितांवरचेच सिनेमे का बनवतो असा तिरकस प्रश्न केला आहे.

तर कुणी म्हटलंय,’वंचितांवरचा सिनेमा मग अमिताभना का घ्यायचं,मोठेपणासाठी?’ तर कुणी मराठीत का सिनेमा काढला नाही असं म्हणत नाकं मुरडली आहेत. आता हे चांगले-वाईट प्रतिक्रिया देणारे दोन गट पडले आहेत.. पण या अशा सोशल मीडियावरील प्रतिक्रियांना आपण भाव देत नाही असा पलटवार नागराज मंजुळेंनी केला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यानं चक्क म्हटलं आहे की,” सोशल मीडियाला चेहरा नाही आणि डोकंही नाही. ज्यांना माझ्या सिनेमाविरोधात काही बोलायचं असेल त्यांनी माझ्या समोर येऊन बोलून दाखवावं. सोशल मीडिया मशीन आहे. जिथे अर्वाच्य भाषेत बोललं जातं. एकमेकांना समजून-उमजून पुढे जावं लागणार आहे. मला जे सिनेमातनं मांडायचं होतं ते मी मांडलंय. आता त्याला वेगळी पुरवणी जोडण्याची काय गरज आहे?’ एखादा माणूस चांगलं काम करू इच्छीत असेल तर त्याचे पाय खेचण्याची समाजातील प्रवृत्ती मी झुंड सिनेमात दाखवली आहे आणि ज्यांना हेच कळत नाही तेच सोशलमीडियाचा आधार घेत त्यांची प्रवृत्ती दाखवत आहेत असा टोलाही नागराजने लगावला आहे.