भारत पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या जवानांमुळेच आपण आपल्या घरात, कुटुंबात सुरक्षित आहोत. आपण आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करतो, आपल्या मुलाबाळांचे वाढदिवस साजरे करतो. पण सैनिकांना मात्र त्यांच्या आयुष्यातील हे क्षण जगता येत नाहीत. कधी शत्रूचा हल्ला होईल आणि समोरून येणारी गोळी छातीच्या चिंध्या करेल हे सांगता येत नाही. तरीही सैनिक रोजचा दिवस शेवटचा दिवस मानून आपले रक्षण करण्यासाठी सीमेवर उभे असतात. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी त्यांना राखी पाठवली जाते, त्यांच्यासाठी शुभेच्छापत्र पाठवली जातात. इतकेच नव्हे तर एकेक क्षण तणावपूर्ण वातावरणात त्यांनाही विरंगुळा मिळावा म्हणून कलाकार त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि मनोरंजनाची भेट देतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आनंद दिला जातो. या कलाकारांच्या पंक्तीत मराठी तारका या कार्यक्रमाचे निर्माते महेश टिळेकर हेदेखील आहेत.

ते नेहमी भारतीय जवानांसाठी विनामूल्य कार्यक्रम करतातच पण त्यापलीकडे जाऊन शत्रूराष्ट्र पाकिस्तान बॉर्डरवरील सियाचिनसारख्या ठिकाणी जाऊन पाकिस्तानविरोधात घोषणा देत महेश टिळेकर यांनी जवानांना साथ दिली. अशाप्रकारे पाकिस्तानबॉर्डरवर उभे राहून पाकिस्तानविरोधी घोषणा देण्याचे धाडस करणारे महेश टिळेकर हे पहिले कलाकार ठरले आहेत. एक कलाकार म्हणून जवानांसाठी शो करण्यासाठी तर टिळेकर यांचे कौतुक होत आहेच पण पाकीस्तानविरोधी घोषणा देऊन सैनिकांन बळ देणारया टिळेकर यांच्या फोटो आणि व्हिडिओवरही कमेंटचा वर्षाव होत आहे. मराठी तारका या शोच्या माध्यमातून सेलिब्रिटी जगतातील सौंदर्यवतींना एकत्र करून मनोरंजनाची पर्वणी जगभरातील रसिकांना देणारे निर्माते अशी महेश टिळेकर यांची ओळख आहे. काहीवेळा सदय़स्थितीवर भाष्य करूनही महेश टिळेकर लक्ष वेधून घेत असतात. असं म्हणतात की कलाकार हा संवेदनशील असेल तर त्याची कला प्रेक्षकांच्या काळजाला भिडते. अशाच कलाकारांना बांधणारा अवलिया म्हणून काम करणारे महेश टिळेकर हे व्यावसायिक निर्माता या पलीकडे जाउन समाजात आपले योगदान देणारयांसाठी काय करता येईल याचाही विचार करतात आणि तो कृतीत आणतात.

त्यापैकीच एक म्हणजे भारतीय जवानांपर्यंत मनोरंजनाची मेजवानी घेऊन जाण्यासाठी ते नेहमीच तयार असतात. उणे शून्याच्या खाली असलेल्या थ्ंडीत, रणरणत्या उन्हात, समोरचे काहीही दिसणार नाही अशा धुक्यात , कोसळणारया पावसात सीमेवर रक्षणासाठी उभ्या असलेल्या जवानांसाठी कार्यक्रम करताना त्याचा कोणताही मोबदला व खर्च टिळेकर घेत नाहीत. आजपर्यत भारत पाकीस्तान बॉर्डरवरील उरी, सियाचीन, कारगील, बारामुल्ला, अशा जोखमीच्या ठिकाणी टिळेकर यांनी त्यांच्या कार्यक्रमाचे शो मोफत केले आहेत. हे कार्यक्रम पाहताना सैनिकांच्या चेहरयावरील आनंद हीच आपली बिदागी असल्याचे ते सांगतात. केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम करून टिळेकर परतीच्या मार्गाला लागत नाहीत तर सियाचीनसारख्या पाकिस्तानबॉर्डरजवळील संवेदनशील ठिकाणाहून भारत माता की जय अशी घोषणा देणारा टिळेकर यांचा आवाजही तेथे घुमतो. भारतीय जवानांकडून टिळेकर यांच्या या धाडसाचे कौतुक झाले आहे. प्रत्येक व्यक्तीला सीमेवर जाऊन देशसेवा करणे शक्य नसले तरी जवानांच्या आयुष्यातील क्षण आनंद करू शकतो आणि त्यांना बळ देऊ शकतो हेच टिळेकर यांनी दाखवून दिले आहे.