झुंड चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मराठी सृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी नागराज मंजुळे यांचे कौतुक केले आहे. जितेंद्र जोशी, सुबोध भावे यांनी देखील चित्रपट चांगला असल्याचे मत व्यक्त केले. मात्र निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी एका वेगळ्या अर्थाने कलाकार मंडळींना धारेवर धरलेले पाहायला मिळाले. महेश टिळेकर म्हणतात की, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू स्तुती सुमनांच्या माळा असं म्हणत फक्त आपल्याच सो कॉल्ड स्वयंघोषित स्टार कलाकारांची वाहवा, वारेमाप स्तुती करणारे काही ग्रुप,टोळी मराठी चित्रपट सृष्टीतही आहे. अभिनय आणि सिनेमा कोळून पिल्यासारखे फक्त आपल्याच स्टार कलाकारांच्या सिनेमावर भरभरून बोलणारी ही मंडळी नवीन कुणाचा, म्हणजे बाहेरून नवीन आलेला कलाकार असेल, दिग्दर्शक असेल तर त्याच्या सिनेमाकडे ढुंकूनही बघत नाहीत.

स्वतः ला स्टार सुपरस्टार समजणारे हे काही ठराविक लोक पृथ्वी जशी शेष नागाच्या डोक्यावर तरलेली आहे तशी मराठी चित्रपटसृष्टी यांच्यामुळे आणि यांच्या चित्रपटांमुळेच तग धरून आहे याची जाणीव बोलताना इतरांना करून देताना स्वतःची अक्कल पाजळत असतात. काही दिवसांपूर्वी याच टोळीतील काही कलाकारांचा एक सिनेमा प्रदर्शित झाला मी थिएटर मध्ये जाऊनच प्रत्येक मराठी सिनेमा पाहत असल्यामुळे तो नवीन प्रदर्शित झालेला सिनेमा पहायला गेलो तर शो कॅन्सल झालेला, दुसऱ्या दिवशी आणखी एका थिएटर वर पोचलो तिथेही तीच अवस्था . शेवटी भांडून दोन तिकिटं काढून मित्रा बरोबर सिनेमा पाहिला. थिएटर मध्ये एकूण सातजणच होते. पुरस्कार सोहळे, टिव्ही चॅनेलवरील रियालिटी शो मध्ये स्वतः च्या नावाचा स्टार, सुपरस्टार म्हणून गवगवा करणारे आणि कामासाठी भरपूर पैसे घेणारे हे स्टार स्वतः अभिनय केलेल्या सिनेमासाठी प्रेक्षक थिएटर पर्यंत आणण्याचा करिश्मा दाखवू शकत नाही याचे दुःख झाले पण प्रेस,मीडिया समोर बोलताना त्या सिनेमातील आणि सिनेमा पहायला स्टायलिश कपडे घालून आलेले हे ठराविक ग्रुप मधील कलाकार एकमेकांची अशी काही तळी उचलत होते,उदो उदो करीत होते की राजदरबारी असणारे भाट पण कमी पडतील.

आमचा चित्रपट मानवी भावनांचे कंगोरे दाखवणारा, संवेदनशील मनाला आर्त साद घालणारा …बोलताना असे साजूक तुपातील,पुस्तकी शब्द वापरून मध्येच त्याला इंग्रजीचा तडका देऊन मिडीयाला बाईट देताना हे नाटकी बोलणारे काही स्टार पाहिल्यावर हसावं की रडावे असं झालं माझं. आपल्याच ग्रुप,कंपू मधील कलाकार, दिग्दर्शकांच्या सिनेमाचे पोस्टर, ट्रेलर स्वतः च्या इन्स्टा,फेसबुक वर शेअर करणारे हे काही कलाकार एखाद्या नवीन किंवा ग्रुप बाहेरील कलाकार,दिग्दर्शकाचे पोस्टर ट्रेलर शेअर करायला हात आखडता का घेतात? स्वतःचे ग्रुप सोडून बाहेरील कुणाच्या सिनेमावर, अभिनयावर बोलताना तोंडं का बंद होतात यांची??? मराठी म्हणून अभिमानानं मराठी भाषा दिनानिमित्त इस्टा, फेसबुकवर फोटो पोस्ट करणारे हे काही स्टार कलाकार आपापले ग्रुप सोडून इतरांचे मराठी सिनेमे थिएटर मध्ये जाऊन का पाहत नाहीत? का आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट? शेवट महेश टिळेकर यांनी म्हटले आहे की वरील माझे मत सरसकट चित्रपट सृष्टीतील सर्वच कलाकारांच्या बाबतीत नाही…