मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन होत आहे त्यात आता विनोदी अभिनेत्री म्हणून परिचित असलेली प्राजक्ता हनमघर हिचे देखील डोहाळजेवण साजरं करण्यात आलं आहे. प्राजक्ता हनमघर हिला तुम्ही अनेक विनोदी शोमधून पाहिले आहे. लवकरच ती महेश टिळेकर दिग्दर्शित हवाहवाई या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ता हनमघर हिची विनोदाची शैली प्रेक्षकांना खूपच भावली आहे. फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोमधून तिने साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना देखील खूपच आवडल्या होत्या.

तिची विशेष उठावदार भूमिका ठरली ती एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतील सोनियाच्या पात्रामुळे. राधाची मैत्रीण सोनिया प्रजक्ताने अतिशय सुरेख निभावली होती. वादळवाट, पुणेरी मिसळ, शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकेतून विविधांगी भूमिका साकारत असताना तीने लूज कंट्रोल, वेडिंगचा शिनेमा, धुरळा हे चित्रपट तसेच डब्बा गुल, कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस, फु बाई फु सारखे विनोदी कार्यक्रम आपल्या विनोदी अभिनयाने तीने गाजवले . योगेश शिरसाट आणि प्राजक्ताची जोडी त्यांच्या विनोदी स्किटमधून प्रेक्षकांना खूपच भावली होती. अभिनयाबरोबरच प्रजक्ताने काही कुकरी शो होस्ट केले आहेत त्यामुळे वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि खाऊ घालणे हे तिचे आवडीचे काम आहे. अनेकदा वृत्तपत्रात तिच्यासंदर्भात असलेले लेख वेळोवेळी प्रसिद्ध झालेले पाहायला मिळतात. खाण्यासोबतच प्राजक्ता आणि तिच्या नवऱ्याला फिरायला जायची भारी हौस आहे. अभिनेत्री प्राजक्ताचे बालपण मुंबईतच गेले दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर आणि पुढे माटुंग्याच्या रुईया कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले.

साधारण ४ वर्षांपूर्वी बार्शी येथील रजत ढाळे यांच्यासोबत प्राजक्ताचा विवाह झाला. रजत ढाळे हे फार्मसिस्ट आहेत. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसि येथे ते कार्यरत होते. बस्ता या चित्रपटात तिने साकारलेली काहीशी विरोधी भूमिका देखील खूपच लक्षवेधी ठरली होती. ‘जरा विसावू या वळणावर’….असे कॅप्शन देऊन प्रजक्ताने नुकतेच आपल्या डोहाळजेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिच्या या गोड बातमीवर अनेक कसलाकारांनि शुभेच्छांचा वर्षाव करत तिचे अभिनंदन केले आहे. १ एप्रिल २०२२ रोजी प्रजक्ताने अभिनित केलेला हवाहवाई हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या गोड बातमीसोबतच अभिनेत्री प्रजक्ताला हनमघर हिला आगामी चित्रपटाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…