जगा आणि जगू दया असं सांगणारी अनेक माणसं आपल्या आयुष्यात आजूबाजूला असतात. तर इतरांच्या कामात नाहक नाक खुपसणारी, विनाकारण एखादय़ाविषयी चुकीच्या गोष्टी बोलणारया माणसांचीही जगात कमी नाही. याचा फटका सेलिब्रिटी कलाकारांना जरा जास्तच बसत असतो. कधी मालिका, सिनेमा, नाटक यातील भूमिकेला ट्रोल करत तर कधी व्यक्तीगत आयुष्यात डोकावून बघत चाहते म्हणवणारे नेटकरी कलाकारांना त्रास देत असतात. कधीकाळी रसिक मायबाप या भावनेमुळे कुणी काही बोलले तरी कलाकार त्याकडे लक्ष देत नव्हते किंवा उलटून बोलत नव्हते. पण आता मात्र कलाकारांनी चुप्पी तोडत अशा आगाऊ नेटकरयांना सोशलमीडियातून सणसणीत उत्तर देण्याचा सप्पाटा लावला आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकतीच तिच्या इन्स्टापेजवर पोस्ट करत शालूतून जोडा मारला आहे. माझ्याशी वाईट वागणारयाची खैर नाही असं म्हणत तिने केलेली पोस्ट नेमकी कुणासाठी आहे हे अदय़ाप स्पष्ट झालं नसलं तरी ऑनस्क्रिन शांतसमजूतदार दिसणारी तेजश्री चिडली तर काय करू शकते याचा ट्रेलरच तिने दाखवला आहे. होणार सून मी या घरची या मालिकेत जान्हवी बनून घरोघरी लोकप्रिय झालेल्या तेजश्री प्रधानचा मालिका ते सिनेमा हा प्रवास कौतुकास्पद आहे. अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या पहिल्या पर्वातील शुभ्राने तिच्या लोकप्रियतेत भरच घातली आहे. पडदय़ावर नेहमीच संयमी आणि आदर्श मुलगी, सून अशा भूमिका करणारी तेजश्री वैयक्तित आयुष्यात खूपच रोखठोक आणि स्पष्टवक्ती आहे. तिने साकारलेल्या भूमिकांबरोबरच तिच्या आयुष्यात आलेल्या वादळांमुळेही ती चर्चेत आली. अभिनेता शशांक केतकर याच्याशी लग्न आणि नंतर घटस्फोट या दोन घटनांनंतर तिच्यावर सातत्याने प्रश्नांचा भडिमार झाला होता. पण आयुष्यात एखादे नातं जुळणे किंवा ते तुटणे याला काही कारणे असतात असं सांगत तेजश्रीने तिच्या आयुष्यातील हे वळण खूप जबाबदारीने पार केले. आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन ही तेजश्रीच्या जीवन जगण्याचा यूएसपी आहे असंही ती नेहमी अनेक मुलाखतींमध्ये म्हणते. शशांकसोबतच्या ब्रेकअपनंतर न थांबता तिने करिअरवर लक्ष केंद्रीत केलं.

शिवाय ती सामाजिक बांधिलकीही जपत असते. काहीदिवसांपूर्वी तिने नेत्रदान करण्याचा संकल्प केल्याचेही सांगितले आहे. तर तेजश्री आपल्या मार्गाने पुढे जात असताना, माझ्याशी जे चुकीचे वागले आहे त्यांना मी सोडणार नाही अशी पोस्ट करत तेजश्रीने तिच्यातील रूद्रावतार दाखवला आहे. या पोस्टमध्ये तिने असं लिहिले आहे की ,”मी दुःख उगाळत बसत नाही, चुकीचं वागणाऱ्यांना मी सोडत नाही. माझ्यात लढा देण्याची ताकद आहे,व्यवस्थेची बळी मी ठरणार नाही,अन्याय सहन करणं माझ्या रक्तात नाही. आयुष्य कसं हवंय हे ठाऊक असलं की यश मिळवणं सोपं होतं”. अशा पद्धतीची ती पोस्ट आहे. या तिच्या पोस्टचं अनेकांनी कौतूक केलं आहे, तर काहींना प्रश्न पडलाय की नेमकी ही पोस्ट तिनं कोणासाठी लिहिली आहे,की आयुष्यातील अनुभवावरनं तिनं ही पोस्ट लिहिली आहे असा चर्चेचा सूर उमटला आहे.