
स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत शांतनू आणि पल्लवीची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीद उतरली आहे. अभिनेत्री सविता प्रभुणे यांनी या मालिकेत सुपर्णा सुर्यवंशीची भूमिका साकारली आहे. या मालिकेअगोदर सविता प्रभुणे २०१९ साली साथ दे तू मला या मालिकेत झळकल्या होत्या त्यानंतर मधल्या काळात त्यांनी हिंदी मालिका साकारल्या आता तब्बल ३ वर्षानंतर त्या पुन्हा एकदा स्वाभिमान या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. सविता प्रभुणे यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी आज जाणून घेऊयात…

सविता प्रभुणे या मूळच्या सातारा जिल्ह्यातील वाईच्या, वाई हे सुरुवातीला छोटंसं गाव असलं तरी त्याला सांस्कृतिक कलेचा वारसा लाभला होता. सविता प्रभुणे यांचे वडील वाईतील प्रसिद्ध लहान मुलांचे डॉक्टर होते. त्यामुळे कला क्षेत्रात जाण्यासाठी त्यांनी आपल्या मुलीला नेहमीच प्रोत्साहन दिले. लहान पणापासूनच शाळेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात त्या नेहमी सहभागी व्हायच्या पुढे कॉलेजमध्ये असतानाही तीन अंकी नाटकांतून काम करता आले. एकांकिका, राज्य नाट्य स्पर्धा अभिनित केल्यावर दिल्लीतील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतले. त्यानंतर नाट्य संपदा या संस्थेचे महाराणी पद्मिनी हे ऐतिहासिक नाटक त्यांनी साकारलं. ‘निष्पाप ‘ हे त्यांचं पहिलं व्यावसायिक नाटक , नाटकांचा हा प्रवास सुरु असताना ‘लेक चालली सासरला’ हा पहिला मराठी चित्रपट त्यांना मिळाला. कळत नकळत, लपंडाव, मामला पोरींचा, फेका फेकी, कुलदीपक, खरं कधी बोलू नये , चित्कार, तू फक्त हो म्हण, चार दिवस प्रेमाचे, खुलता कळी खुलेना, जावई विकत घेणे आहे, तेरे नाम, तुझसे है राबता, कोशिश, पवित्र रिश्ता, साया अशा अनेक हिंदी मराठी मालिका, चित्रपटातून नाटकांतून त्यांनी विविधांगी भूमिका गाजवल्या. एक मुख्य नायिका ते चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाने अगदी चोख बजावल्या आहेत.

नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये अभिनयाचे धडे गिरवत असताना राजेश सिंग यांच्याशी त्यांची मैत्री झाली होती. १९८४ साली त्या दोघांनी प्रेमविवाह केला. अभिनयाचे धडे एकत्रच गिरवल्याने सविता प्रभुणे यांनी चित्रपटात काम करण्यास त्यांचा पूर्ण पाठिंबा असायचा. परंतु २००० साली दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांची मुलगी सात्विका ही केवळ आठ ते नऊ वर्षांची होती. घटस्फोटानंतर सात्विकाचा सांभाळ त्यांनी मोठ्या जिद्दीने केला. सात्विका दिसायला अतिशय देखणी असून तीने मधल्या काळात मॉडेलिंग केलं आहे शिवाय सौंदर्य स्पर्धेत देखील सहभाग दर्शवला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेली त्यांची मुलगी सात्विका सिंग ही रुद्रेश आनंद सोबत विवाहबद्ध झाली आहे. अभिनेत्री सविता प्रभुणे ह्यांना स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून पदार्पणासाठी खूप खूप शुभेच्छा…