ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत उर्फ कुमुद सुखटणकर यांचे ८९ वर्षी आज ११ जानेवारी २०२२ रोजी माहीम येथील त्यांच्या निवासस्थानी दुःखद निधन झाले आहे. रेखा कामत आणि चित्रा नवाथे या बहिणींनी मराठी चित्रपट सृष्टीतील एक काळ गाजवला होता. चित्रा नवाथे या पूर्वाश्रमीच्या कुसुम सुखटणकर होय. मुंबईत दादर येथील मिरांडा चाळीत सुखटणकर कुटुंब राहत होते. चार बहिणी, दोन भाऊ, आईवडील असा चित्रा म्हणजे कुसुम यांचा लग्नापूर्वीचा परिवार. पन्नासच्या दशकात अनेक सिनेमात झळकलेल्या अभिनेत्री चित्रा नवाथे यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली होती.

नातेवाईक असूनही चित्रा नवाथे यांच्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली होती. मुलूंडमधील वृद्धाश्रमात असल्याची माहिती एका वृत्त माध्यमातून व्हायरल झाली होती. चित्रा यांना स्मृतिभ्रंश झाला असल्याचे त्या वृत्तात सांगितले होते. चित्रा यांनी लाखाची गोष्ट, वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती, बोलवता धनी, टिंग्या, अगडबम, बोक्या सातबंडे अशा मालिका आणि सिनेमात काम केलं आहे. रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. या दोघींनी लाखाची गोष्ट या चित्रपटात एकत्रित काम केले होते. रेखा कामत या पूर्वाश्रमीच्या कुमुद सुखटणकर होय. चित्रपट लेखक ग रा कामत यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. एका लग्नाची दुसरी गोष्ट, प्रपंच, माणूस, तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रेमाच्या गावा जावे, लग्नाची बेडी, ऋणानुबंध, अग्गबाई अरेच्चा! या चित्रपट, नाटक आणि मालिकेतून त्यांनी अभिनय साकारला होता. खूप वर्षांपूर्वी त्यानी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनयातून निवृत्ती स्वीकारली होती. रेखा कामत यांच्या निधनाने मराठी सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. रेखा कामत याना आमच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली!!!