४ एप्रिल पासून कलर्स मराठी वाहिनीवर भाग्य दिले तू मला ही नवी प्रसारित होत आहे या मालिकेतून निवेदिता सराफ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेतून त्या नायकाची आई रत्नमाला मोहिते ही भूमिका साकारत आहेत. आपल्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त असलेल्या निवेदिता सराफ यांना नुकताच एक धक्कादायक अनुभव आला आहे. रविवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास विलेपार्ले इथून इथून त्या आपल्या घरी चालल्या होत्या. जुहू येथील जेव्हीपीडी जंक्शनजवळ त्यांची गाडी सिग्नलवर थांबली होती. मागून येणाऱ्या एका गाडीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक मारली. या जोरदार धडकेमुळे गाडीचे काही नुकसान झाले आहे का हे पाहण्यासाठी त्यांचा ड्रायव्हर खाली उतरला.

मात्र ड्रायव्हर खाली उतरताच धडक देणाऱ्या गाडीतील व्यक्तीने ड्रायव्हरलाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यात त्या व्यक्तीने त्यांच्या ड्रायव्हरला मारहाणही केली. अजय ठाकूर असे निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरचे नाव आहे. वाद घालणाऱ्या व्यक्तीने निवेदीता सराफ यांनाही धमकावले आणि गाडीची काच खाली करण्यास सांगितले. सदर व्यक्तीची अरेरावी आणि वाद चिघळत असल्याचे पाहून त्यांच्या ड्रायव्हरने पोलिसांना फोन लावला. ते पाहून त्या व्यक्तीने तिथून काढता पाय घेतला आणि रागाच्या भरात आणखी एकदा बेस्ट चालकाला शिवीगाळ केली. ह्या सर्व प्रकरणाची गंभीर बाब लक्षात घेऊन निवेदिता सराफ यांनी जुहू पोलीस ठाण्यात त्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. जुहू पोलिसांनी तक्रार दाखल होताच गाडीचा नंबर घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले आहेत. सदर व्यक्तीची गाडी नाशिक नोंदणीकृत असल्याचे सांगितले जाते. ह्या गाडीच्या मालकाचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधाकर शिरसाट यांनी म्हटले आहे.