अभिनेत्री मनीषा केळकर ही हिंदी चित्रपट लेखक राम केळकर आणि अभिनेत्री जीवनकला यांची कन्या आहे. आईच्या पावलावर पाऊल टाकत मनीषा मराठी चित्रपट सृष्टीत आणि हिंदी सृष्टीतही झळकू लागली.मनीषा केळकर हिने भोळा शंकर , बंदूक, झोल, लॉटरी, अशा हिंदी मराठी चित्रपटात अभिनय साकारला आहे. दरम्यान तिने फॉर्मुला कार रेसर म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली. २०१८ साली मनीषाचा कार अपघात झाला होता. ही बातमी मनीषाने सोशल मीडियावर शेअर करून त्यावर उपचार कसे सुरू केले हे सांगितलं आहे.

मनीषाने एक व्हिडिओ शेअर केला आहे तिच्या या व्हीडीओमुळे अनेकांना प्रेरणा मिळू शकते असे ती म्हणते. प्रवास करताना मी कारच्या पाठीमागच्या सीटवर बसले होते. कार एकदम वेगाने पुढे जात असताना क्रॅश झाली. या अपघातात ४ ते ५ ठिकाणी मला फ्रॅक्चर झालं तर १३ बरगड्या मोडल्या होत्या. कित्येक दिवस मी बेडवरच झोपून होते. डॉक्टरांनी मला कार रेसिंग करू शकणार नाही असेच सांगितले होते. त्यानंतर डॉ निलेश मकवाना यांनी कमीतकमी मला दोन पायावर उभे राहिल इतपत सज्ज केलं. निराश न होता मनीषाने उपचार झाल्यानंतर फिजिओथेरपी सुरू केली आणि हळूहळू रिकव्हर होत गेली. त्यानंतर फिटनेस कोच आणि न्यूट्रिशनिस्ट अक्षय कदम यांच्या सल्ल्याने आणि मदतीने वर्कआउट करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला एक किलोचे वजन उचलतानाही मला खूप त्रास होत होता मात्र मी ही थेरपी सुरू केली होती मग हळूहळू एक किलो नंतर सात किलो पर्यत मी वजन उचलू लागले. अपघातातून पूर्णपणे रिकव्हर झाल्यानंतर काही दिवसांनी कार रेसिंग सुरू करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मला खूपच अशक्तपणा जाणवू लागला परंतु वर्कआउट नंतर मसल पॉवर, स्टॅमिना वाढू लागला.

ही गोष्ट माझ्या कार रेसिंगच्या करिअरसाठी खूपच महत्वाची होती. कार अपघातानंतर मी खूपच खचून गेले होते. परंतु या सर्व गोष्टींवर मात करत उत्तम आहार आणि नियमित व्यायाम यामुळे मी पुन्हा एकदा अभिनय आणि कार रेसिंग करण्यासाठी सज्ज झाली आहे.. असे मनीषा म्हणते. फिटनेस ट्रेनर अक्षय कदम तिच्या वर्क आउट बद्दल सांगताना म्हणतो की, मनीषा जेव्हा पहिल्या दिवशी वर्क आउट करण्यासाठी आली तेव्हा तिला बेसिक स्टेप्स करताना देखील खूपच त्रास व्हायचा. सुरुवातीला १ किलोच्या वजनाची डंबेल्स उचलण्यासाठी मनीषाला त्रास व्हायचा परंतु योग्य वर्कआउटमुळे आता ती ५० किलोचे डेडलिफ्ट सहज उचलू शकते. तिच्या बॉडीट्रान्सफॉर्मेशनचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. परंतु अभिनय आणि कार रेसिंगच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मनीषाने तिच्या जिद्दीने यावर मात केलेली पाहायला मिळते.”.