बहुतेक सर्वच मालिका मूळ कथेला वळण देऊन त्या वर्षोनुवर्षे वाढवल्या जातात. त्यामुळे अशा मालिकांचा कालांतराने कंटाळा यायला लागतो. खरंतर पूर्वीच्या काळी तेरा भागांची मालिका खूप काही शिकवून जात होती आणि ती तितकीच आपुलकीने पाहिलीही जात होती. मात्र आताच्या मालिका वर्षानुवर्षे कशा चालत राहतील आणि त्या प्रेक्षकांच्या माथी कशा मारल्या जातील याकडे जास्त लक्ष देण्यात येते. मुळात प्रेक्षकांकडून ह्या मालिका पाहिल्या जातात त्याचमुळे त्या मालिकांचा टीआरपी देखील निश्चित वाढलेला पाहायला मिळतो.

नुकतेच अभिनेते प्रशांत दामले यांच्या एका पोस्टवर प्रेक्षकाने या मालिकांबाबत एक मिश्किल प्रश्न विचारला आहे की, ” टुकार मराठी मालिका कशा बंद होतील? ते सांगा”. प्रेक्षकाच्या या प्रश्नावर प्रशांत दामले यांनी “बघणं बंद केलं की”… अशी एक भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर त्यांच्या चाहत्यांनी देखील लाईक करून अशीच मिश्किल उत्तरं दिली आहेत. गेल्या काही वर्षांपासून अभिनेते, निर्माते प्रशांत दामले हे अभिनय कार्यशाळा T- shcool चालवत आहेत. आजवर चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. साखर खाल्लेला माणूस, एका लग्नाची गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट , वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, भो भो, घरकुल या गाजलेल्या चित्रपट, आणि नाटकातून ते प्रेक्षकांसमोर आले. सध्या नाटक आणि अभिनय कार्यशाळेत ते व्यस्त आहेत. महाराष्ट्रभरातून त्यांच्या या अभिनय शाळेतून आजवर अनेक कलाकार त्यांनी घडवले आहेत. त्यांच्या या कार्यशाळेला खूप मोठा प्रतिसाद मिळत असून सध्या ३२ वी बॅच देखील हाऊसफुल्ल झाली आहे.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ४८६ जणांनी ईच्छा व्यक्त केली होती त्यातील ३१ जणांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. अशा माहितीची एक पोस्ट प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर दिली होती. त्यांच्या ह्या पोस्टवर एका चाहत्यांच्या हा मिश्किल प्रश्न विचारला होता. मालिकाच पाहिली नाही तर टीआरपी मिळणार नाही त्यामुळे टुकार मालिका आपोआपच बंद होतील असाच एक संकेत त्यांनी त्यांच्या या प्रतिक्रियेतून दिला आहे. टीआरपी न मिळाल्याने आजवर अनेक चांगल्या कथानक असलेल्या मालिका देखील बंद झाल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे मालिका बंद करणे हे सर्वासर्वी प्रेक्षकांच्याच हातात आहे असे म्हणायला हरकत नाही…