सेलिब्रिटी कलाकारांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी चाहत्यांचा नेहमीच उडय़ा पडत असतात. शिवाय मायबाप प्रेक्षक म्हणत सेलिब्रिटी कलाकारही चाहत्यांकडून मिळणारया प्रतिक्रियांची वाट पाहत असतात. आपल्या भूमिकेला प्रेक्षकांची दाद मिळावी यासाठीच तर कलाकारांची धडपड सुरू असते. प्रेक्षक चाहत्यांकडून मिळालेल्या कौतुकाबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील काही लोकांकडून कलाकारांना टोमणेही ऐकून घ्यावे लागत असतात. पूर्वी कलाकार मंडळी कुणाला दुखवायला नको म्हणून अशा टोमण्यांकडे दुर्लक्ष करत होती पण आजकाल सोशलमीडियावर सक्रिय असलेले कलाकार टोमणे मारणारया किंवा पाठीमागे ट्रोल करणारयांना खरमरीत उत्तर देत आहेत. यामध्ये अभिनेता, निवेदक, लेखक अमेय वाघ याचीही वर्णी लागली आहे.

नुकताच त्याने एक प्रातिनिधीक फोटो शेअर करत पाठीमागे टोमणे मारणारया दाखवला आरसा अशी कॅप्शनही दिली आहे. अमेय मुळातच हजरजबाबी म्हणून प्रसिध्द आहे. त्यामुळे सोशलमीडियावर त्याने शेअर केलेला फोटो आणि कॅप्शनमधून त्याने ज्या कुणाला हा टोला लगावला आहे त्याला चपखल उत्तर देण्यात अमेयने बाजी मारली आहे. लवकरच अमेय वाघ हा अभिनेता सिध्दार्थ जाधवसोबत मराठी फिल्मफेअर अॅवार्डचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका, तसेच फास्टर फेणे, मुरांबा, पोपट , झोबिवली यासह अनेक सिनेमांमध्ये अमेयने त्याच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अर्शद वारसीसोबत त्याने असूर या हिंदी वेबसिरीजमध्येही काम केले आहे. अमेय हा उत्तम स्टँडअप कॉमेडीही करत असून भाडिपा या ग्रुपसोबत तो जोडलेला आहे. द ग्रेट इंडियन मर्डर या वेबसिरीजमध्येही अमेयने काम केले असून गोविंदा मेरा नाम या सिनेमात अमेय बॉलीवूड स्टार विकी कौशल याच्यासोबत झळकणार आहे. मनोरंजनाच्या प्रत्येक माध्यमात ठसा उमटवणारा अमेय वाघ त्याच्या हटके आणि ट्रेंडिंग व्हिडिओमुळे सोशलमीडिया विश्वात नेहमीच चर्चेत असतो. अमेयझोन या इन्स्टाहँडलवरून तो त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो.

नुकताच त्याने त्याच्या इन्स्टा पेजवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो मरून रंगाच्या लाँग शेरवानीमध्ये दिसत आहे. एका जाहिरातीसाठी त्याने हे फोटो शूट केले असून याच प्रसंगाचे औचित्य साधून त्याने एका फूलकट आरशाला पाठमोरा टेकत ट्वीन इमेज साकारली आहे. फोटोमध्ये अमेय आणि त्याची मिरर इमेज एकमेकांशी पाठमोरे आहेत. हाच फोटो त्याने सोशलमीडियावर शेअर केला आहे. अमेयच्या फोटोपेक्षाही त्याखाली त्याने लिहिलेल्या, माझ्या पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत, त्यांना आरसा या ओळींना नेटकरी चाहत्यांनी दाद दिली आहे. अमेयने नेमक्या या ओळी कुणासाठी लिहिल्या आहेत आणि त्याला त्याच्या मागे कोणी वाईट बोलले आहे याचे गुपित मात्र त्याने या पोस्टमध्ये उलगडलेले नाही, पण त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.