आपल्याला कुठल्या एका खास भूमिकेमुळे ओळखलं जावं हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. असेच काहीसे मराठी अभिनेत्रीच्या बाबतीत घडलेले पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सध्या ह्या मराठी अभिनेत्रीचा भिकारीच्या वेशातील एक फोटो व्हायरल होत आहे. या गेटपमुळे खरं तर ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. परंतु याबाबत उलगडा झाला असून भिकारीच्या वेशातील ही अभिनेत्री “गौरी किरण” असल्याचे स्पष्ट झाले आहे. गौरी किरणने हा गेटअप नेमका का आणि कशासाठी केला आहे याबाबत जाणून घेऊयात…

स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत सध्या गौरी किरण सोयराबाईंची भूमिका साकारत आहे. सुबोध भावे सोबत पुष्पक विमान या चित्रपटातून तिने महत्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय सुंदरा मनामध्ये भरली, स्पेशल5, बोलते तारे यातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. गौरी किरण लवकरच आपल्या आगामी चित्रपट “ब्लॅंकेट ” च्या माध्यमातून एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील मानसिक संतुलन ढासळलेल्या भिकारीच्या भूमिकेमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या भूमिकेसाठी गौरीला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले होते हे तिच्या लुकवरूनच समजते. कचरा डेपोत राहणाऱ्या आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या स्त्री ची ही भूमिका गौरीसाठी मोठी आव्हानात्मक ठरली आहे. चित्रपट वास्तववादी वाटवा यासाठी दिग्दर्शक राज गोरडे यांनी कचरा डेपोत जाऊन खऱ्या खचऱ्यामध्येच गौरीला राहायला लागणार, तिथेच झोपायला लागणार, त्याच कचऱ्यात जेवायलाही लागणार असे सांगितले होते.

हे आव्हान पेलायचे असे गौरीने मनोमन ठरवले होते. चित्रपटात काम करत असताना कचऱ्याशी संपर्क आल्याने गौरीला दोन वेळा युरिन इन्फेक्शन झाले होते. या गेटअपसाठी गौरीने कित्येक दिवस नखंही साफ केली नव्हती तर विस्कटलेला वीग तिच्या केसांमध्ये अडकवला असल्यामुळे तिचे बरेचसे केस तुटले होते. ओढूनताणून काहीतरी देखावा करण्यापेक्षा हा चित्रपट प्रेक्षकांना संपूर्णतः नैसर्गिक वाटावा हाच त्यामागचा मुख्य उद्देश असल्याने याबाबत दिग्दर्शकाने अगोदरच गौरीला सांगितले होते. नैसर्गिकरित्या जे जे शक्य होईल ते ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न असावा असे दिग्दर्शकाचे म्हणणे होते त्यानुसार गौरीला खऱ्या कचऱ्यामध्येच शूटिंग करावे लागले होते. तिला कचऱ्यामध्ये झोपावे लागणार आणि तिथेच जेवायलाही लागणार हे माहीत असूनही तिने हे आव्हान स्वीकारले. या चित्रपटासाठी ऑडिशन दिली तेव्हा लीड रोलसाठी गौरीची निवड करण्यात आली होती इथेच तिला याभूमिकेबाबत सांगितले होते. सुरुवातीला जेव्हा खऱ्या कचऱ्याच्या डेपोत तिने प्रवेश केला त्याच वेळी “आता मागे हटायचं नाही..” हा निर्णय तिने घेतला होता.