
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अदिती सारंगधर, रेशम टिपणीस, फुलवा खामकर यांनी एकत्रित येऊन अभिनेत्री “स्मिता तांबे” हिचे डोहळजेवण साजरे केले होते. ‘कुणी तरी येणार येणार गं…’ या गाण्यावर ठेका धरत अदितीने ही आनंदाची बातमी सांगून त्याचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. नुकतेच स्मिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर कळवली आहे. स्मिताच्या या गोड बातमीने तिच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

७२ मैल एक प्रवास, जोगवा, नाती गोती, गणवेश, लाडाची मी लेक गं, सावट, परतू अशा चित्रपटातून स्मिताने दमदार भूमिका साकारल्या आहेत. काही हिंदी चित्रपटातूनही तिने अभिनय साकारलेला पाहायला मिळाला. सिंघम रिटर्न, डबल गेम, पंगा, सेक्रेड गेम्स२ अशा हिंदी चित्रपटातून तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या. झी मराठीवरील लाडाची मी लेक गं या मालिकेतूनही तिने आपल्या अभिनयाचा दरारा कायम राखून ठेवताना दिसला. २०१९ साली स्मिता ही वीरेंद्र द्विवेदी यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. लग्नानंतर उत्तर भारतात असलेल्या तिच्या सासरी स्मिताचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. लग्नानंतर स्मिताने पहिल्यांदाच तिच्या घरी गौरिंचे पूजन देखील केलेले पाहायला मिळाले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्मिता सासरकडच्यांचे आणि तिथल्या संस्कृतीचे कौतुक करताना नेहमीच दिसते. स्मिता आणि वीरेंद्र यांना कन्यारत्न प्राप्ती झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन…